सांगली : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ३६ महिने उलटूनही त्यांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात शासकीय यंत्रणांना अपयश येत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाला सादर करण्यासाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. मागण्यांचे काळे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनास शनिवारी तीन वर्षे पूर्ण झाली तरीही सरकारकडून त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात अपयश येत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने राज्यभर निदर्शने, आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून सांगलीत शनिवारी स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची सुरुवात जयश्रीताई मदन पाटील आणि महापौर हारुण शिकलगार यांनी सही करून केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, कांचन कांबळे, जनार्दन गोंधळे आदी उपस्थित होते. त्यानंतर दिवसभर सह्या करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले काळे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिस यंत्रणांना अपयश आले असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या तिन्ही हत्यांच्या पाठीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक करावी, संशयित म्हणून अटक केलेल्यांची कसून चौकशी करावी, एनआयएने फरार घोषित केलेल्या सनातन संस्थेच्या साधकांची छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी लावावीत, राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार सनातन संस्थेवर बंदी घालावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, अॅड. के. डी. शिंदे, नामदेवराव करगणे, लीलाताई जाधव, डॉ. संजय निटवे, प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, अॅड. अमित शिंदे, अण्णा गेजगे, शशिकांत सुतार, मुनीर मुल्ला, भास्कर सदाकळे, सुहास यडोरकर, सुहास पवार, कबीर मुलाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मॉर्निंग वॉक...शहरासह जिल्ह्यात तासगाव, शिराळा येथे सकाळी निर्भय मॉर्निंग वॉक, इस्लामपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सह्यांच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
दाभोलकरांचे मारेकरी ३६ महिन्यांनंतरही मोकाट
By admin | Published: August 20, 2016 11:07 PM