सांगली :
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. संपूर्ण जिल्हाभरातून आलेल्या गणेशभक्तांमुळे मिरज शहर गजबजून गेले होते. सलग २७ तास चाललेली मिरवणूकीची यशस्वी सांगता झाल्यानंतर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी कर्मचाऱ्यांसोबत ठेका धरत आनंद साजरा केला.
मिरज शहरातील गणेश विसर्जनाला दरवर्षी मोठी गर्दी असते. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांना यापासून दूर रहावे लागले होते. यंदा सर्व निर्बंध हटविल्यानंतर झालेल्या गणेशोत्सवात सर्वांचाच उत्साह दिसून आला. मिरज शहरात ४०० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली होती तर अनंत चतुदर्शीदिवशी २५० मंडळांनी मिरवणूकीत भाग घेतला. विसर्जन मिरवणुका व्यवस्थित पार पाडण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून पोलीस कार्यरत होते. कोणत्याही विघ्नाविना गणेशोत्सव पार पडल्याने शेवटी पोलीस कर्मचाऱ्यांनी वाद्यांच्या गजरात ताल धरला. यावेळी उपस्थित अधीक्षक दीक्षित गेडाम यांनीही कर्मचाऱ्यांचे कौतुक तर ताल धरला. सलग बंदोबस्तामुळे पोलिसांच्या चेहऱ्यावर आलेला ताण या क्षणांमुळे दूर झाला. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद व हसू फुलले.