सांगली : वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हिमालयाच्या बर्फाळ वाटांना आव्हान देत ‘सरपास शिखर’ सर करीत सर्वात छोट्या ट्रॅकरचा बहुमान मिळविणाऱ्या सांगलीच्याउर्वी पाटीलची वाटचाल आता रुपेरी पडद्याच्या शिखराकडे सुरू झाली आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित तिचा पदार्पणातला पहिलाच चित्रपट ‘डीअर मॉली’ हा आॅस्कर स्पर्धेच्या स्क्रिनिंगसाठी पात्र ठरला आहे. ७ ते १३ डिसेंबरदरम्यान हा चित्रपट अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे प्रदर्शित होत आहे.
ऊर्वी अनिल पाटील हिचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग. वडिलांच्या नोकरीनिमित्त सध्या ती गोव्यात राहते. तरीही गावाशी तिची नाळ कायम आहे. हिमालयातल्या बर्फाळ वळणवाटा असोत की, सिनेमाच्या कॅमेºयासमोरचा लख्ख प्रकाशझोत...अवघ्या दहा वर्षाची उर्वी पाटील समोर आलेले कोणतेही आव्हान झेलायला सज्ज असते. तिने महाराष्ट्रातील सर्वात छोटी ट्रेकर होण्याचा बहुमान मिळवल्याला अवघे काही महिनेच झाले असताना, तिच्या नावाशी नवी कीर्ती जोडली गेली आहे. ट्रेकिंगच्या यशानंतर माध्यमातून झळकलेल्या उर्वीला पाहताच गजेंद्र अहिरे यांना तिच्यात त्यांना हवी असलेली मॉली दिसली आणि उर्वी पाटील सिनेमाच्या कॅमेºयात बंदिस्त झाली.
‘डीअर मॉली’ची गोष्ट एका बापापासून दुरावलेल्या मुलीची गोष्ट आहे. ध्येयवेडापोटी देशांतर केलेल्या व तरीही स्वत:च्या मुलांची चिरंतन ओढ बाळगणाºया बापाची गोष्ट आहे. बाप-लेकीच्या नात्याला स्मरणरंजनाचा आयाम देणाºया पत्रांची गोष्ट आहे. इंडो-स्विडिश प्रकल्प असणारा हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये स्वतंत्रपणे निर्माण करण्यात आला आहे. यातील इंग्रजी चित्रपट आॅस्कर स्पर्धेसाठी प्रदर्शित केला जात असल्याचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
या चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण स्विडनमध्ये झाले आहे, तर काही दृष्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये चित्रित केली आहेत. चित्रपटाची नायिका मॉली वडिलांच्या देशांतराच्या खाणाखुणा शोधत एका प्रवासावर निघाली आहे.तिच्या वयाचा एक टप्पा उर्वी पाटीलवर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात तरुणपणीच्या मॉलीच्या भूमिकेत गुबार्नी गील आहे, तर मराठीतील अलोक राजवाडे, अश्विनी गिरी, मृण्मयी रानडे यांच्यासोबत स्विडिश अभिनेत्री लिया बॉयसन आणि ख्रिस हॉल्मग्रेन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.अनुभव खूप सुंदर : उर्वी पाटीलया चित्रपटाचा अनुभव खूप काही शिकवणारा होता. यापूर्वी कॅमेºयासमोर काम केले असले तरी, सिनेमासाठी प्रथमच काम करत होते. त्यात पहिल्याच चित्रपटात माझी आवडती अभिनेत्री मृण्मयीसोबत मला काम करायला मिळाल्यामुळे खूप आनंद झाला असल्याची भावना उर्वी पाटीलने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.