मिरज : मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात गुरुवारी महापौर व रंगकर्मीच्या बैठकीनंतर महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई व विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्यात एकेरी भाषेत हमरीतुमरी झाली. तुला मी मंत्री होऊन दाखवतोच, असा सज्जड दम देसाईंनी भरला. यावेळी उपस्थितांनी मध्यस्ती करीत दोघांनाही आवरले. दोघांतील जुगलबंदी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहातील सोयीसुविधांबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत गुरुवारी नाट्यकर्मींची बैठक होती. बैठकीनंतर महापौर व सर्व उपस्थित नाट्यगृहाच्या बाहेर आले. यावेळी विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या चेंबरबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रवेशद्वारातच रस्त्यावर दीड फूट उंचीचे ड्रेनेजचे चेंबर बांधले आहे. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. नगरसेवक मेंढे यांनीही अधिकाऱ्यांना यापूर्वी सूचना देऊन चेंबर खाली घेण्यास सांगितले होते. मात्र एक वर्ष झाले तरी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात होते. मेंढे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी शहर अभियंता देसाई व मेंढे यांच्यात जोरदार वाद झाला. हे काम ड्रेनेज विभागाचे असून, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारू नका, आवाज वाढवून बोलण्याची गरज नाही, असेही देसाईंनी सुनावले. यामुळे मेंढे यांचा पारा अधिकच चढला. त्यांनी देसाईंना जोरदार प्रत्युत्तर दिले. दोघांनीही एकमेकांचा एकेरी भाषेत सुनावल्याने वाद विकोपाला गेला. स्थायी समितीचे निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, करण जामदार यांनी वादात हस्तक्षेप करून दोघांनाही आवरले. नाट्यगृहाच्या आवारात अधिकारी व नगरसेवकांच्या या नाट्यामुळे गर्दी जमली होती.
नोकरीची गरज नाही!
संजय मेंढे यांनी, ‘तुम्ही महापालिकेचे मालक नाही, तर नोकर आहात’, असे बजावल्याने संतप्त झालेल्या देसाई यांनी, ‘मी महापालिकेचा नव्हे तर शासनाचा नोकर आहे, मला नोकरीची गरज नाही. माझी ताकद मोठी आहे, एक दिवस येथे मंत्री म्हणून येऊन दाखवू शकतो’, असेही सुनावले. त्याची चर्चा शहरात सुरू होती.