मिरज : शिंदेवाडी (ता. मिरज) येथील लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर शाळेतील पोषण आहारातील ठेकेदाराला अखेर जाग आली. या ठेकेदाराने निंकृष्ट डाळ आज (सोमवारी) बदलून दिली. यानिमित्ताने ‘लोकमत’ने यापूर्वी केलेल्या जागरणाच्या व वृत्तांकनाबाबत चर्चेच्या फैरी पुन्हा झडू लागल्या आहेत.शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पंचायत समिती सदस्य शंकर पाटील यांनी पोषण आहाराच्या दर्जाबाबत तपासणी केली होती. त्यावेळी तूर व मूगडाळीच्या दर्जा सुमार होता. तूरडाळ किडलेली होती. त्यांनी पंचायत समितीच्या सभापतींना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आज सायंकाळी साडेचार वाजता ठेकेदाराचे कर्मचारी नवीन माल घेऊन शाळेत आले. यावेळी शाळेतील सुमार व कीड असलेली तूरडाळ परत घेऊन त्यांनी ९० किलो नवीन तूरडाळ दिली.लोकप्रतिनिधींनी दखल घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला. लगेचच ठेकेदाराने तूरडाळ बदलून दिली; पण अनेक शाळांत तक्रारीविना हा प्रकार सुरू आहे. वाळवा तालुक्यात कामेरी केंद्रातील शिक्षकांनी असा प्रकार निदर्शनास आणूनही खराब मालाऐवजी बदलून दिला जाणारा चांगला माल वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. अशा प्रकाराला कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर निकृष्ट तूरडाळ मिळाली बदलून
By admin | Published: January 05, 2015 11:53 PM