सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे संपूर्ण जिल्ह्यात शांतता होती. अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त गर्दीही नसल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर वर्दळ वाढली असून त्याचा परिणाम म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून गेल्या २१ दिवसात आठ खून झाले आहेत, तर अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांनुसार संचारबंदी आदेश लागू होता. त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच घटले होते. त्यात रस्त्यावर वर्दळ नसल्याने अपघातही कमी होते. याच कालावधित पोलीसही बंदोबस्तावर असल्याने गुन्ह्यांचे घटलेले प्रमाण पथ्यावर पडले होते. पण शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मात्र, गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: मारामारी, वादावादीसह अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनची स्थिती असतानाही विविध प्रकारच्या २३४ घटना घडल्या आहेत.
मे महिन्यात आत्महत्येच्या घटनाही वाढत असून या पंधरवड्यात नऊ जणांनी जीवन संपविले आहे. यात सावकारीच्या जाचाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याशिवाय मारामारीसह दुखापतीच्या ७१ घटना घडल्या आहेत.
तुंग, वाळवा येथील घटना गंभीरएप्रिल महिन्यात खुनाच्या तीन घटना घडल्या होत्या, तर चार खुनाचे प्रयत्न, १६ ठिकाणी घरफोडी, २९ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. मे महिन्यात मात्र शिथिलता मिळाल्यानंतर जिल्ह्यात नागज, सांगलीवाडी, सूर्यगाव, वाळवा, कुमठे, कुपवाड, नागाव कवठे व तुंग येथे खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात तुंग येथे एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला, तर वाळवा येथे सावत्र आई व वडिलाने मुलीचा खून केला होता.
लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर नागरिक बाहेर पडत असल्याने काही घटना घडत आहेत. घटना वाढत असल्या तरी त्यावर जरब बसविण्यासाठी प्रशासन ठाम आहे. तुंगची घटना गंभीर असून, कोणत्याही गुन्ह्यातील गुन्हेगार असो, यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- मनीषा दुबुले, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली
एप्रिलमधीलगुन्ह्यांची आकडेवारी03खून04खुनाचे प्रयत्न09बलात्कार16घरफोड्या29चोरी81दुखापत