सांगली : महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील व डॉ. पतंगराव कदम यांच्या आदेश येईल, तेव्हा महापौरपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका महापौर कांचन कांबळे यांनी आज स्पष्ट करताना या प्रकरणावर पडदा टाकला. महापौरांसोबतच आता उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांचाही राजीनामा घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले. पण त्यासाठी आता सत्ताधाऱ्यांना नेत्यांच्या आदेशाची वाट पहावी लागणार आहे. येत्या १७ जानेवारी रोजी महासभा होत आहे. या सभेत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होणार का, याची उत्सुकता लागली आहे. महापौर कांबळे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्या राजीनामा देणार की नाही, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनाम्याविषयी आदेश दिला नसल्याचे कांबळे यांनी काल स्पष्ट केल्याने सत्ताधारी गोटात खळबळ उडाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौरांच्या राजीनाम्याची चर्चा होती. पण प्रत्येकवेळी या चर्चेला वेगवेगळे वळण लागत होते. डिसेंबर महिन्यात सत्ताधाऱ्यांनी महासभाच न घेऊन या चर्चेला आणखी बळकटी आणली होती. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुकांत अस्वस्थता पसरली. अखेर आज महापौर कांबळे यांनी नेत्यांचा आदेश आल्यानंतर राजीनामा देऊ, असे जाहीर करीत या चर्चेला पूर्णविराम दिला.त्या म्हणाल्या की, सव्वा वर्षापूर्वी मदन पाटील व पतंगराव कदम यांनी मला महापौरपदाची संधी दिली. या काळात अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश आले. महापौर म्हणून आपणाला मुदतवाढ द्यावी, अशी इच्छा नाही. नगरसेवकांच्या आढावा बैठकीत मदनभाऊंनी इतर नगरसेवकांनाही महापौरपदाची संधी देण्याचे संकेत दिले होते. पण अजून त्यांनी राजीनाम्याविषयी कोणताही आदेश दिलेला नाही. गटनेते किशोर जामदार यांच्यामार्फत या नेत्यांचा आदेश येईल, तेव्हा आपण निश्चित राजीनामा देऊ, असे स्पष्ट केले. गटनेते किशोर जामदार म्हणाले की, मदनभाऊ व पतंगराव कदम यांचा निरोप येईल तेव्हा महापौरांचा राजीनामा घेण्यात येईल. महापौरांनीही हीच भूमिका मांडली आहे. महापौरांनी कधी राजीनामा द्यायचा, हे नेत्यांनी अजून सांगितलेले नाही. ते ऐनवेळी सांगतील, तेव्हा निर्णय होईल. महापौरांसोबतच उपमहापौरांचही राजीनामा होणार आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे संकेत मदनभाऊंनी दिले आहेत. महापौरांनी महासभेतच राजीनामा द्यावा, असा प्रघात आहे. महासभेत जरी राजीनामा दिला नाही तर, विशेष महासभा घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वर्षभरात दोन महापौर शक्यनूतन महापौर व उपमहापौरांबाबत मदनभाऊ व पतंगराव कदम हे निर्णय घेतील. दोन्ही नेते एकत्र बसून नगरसेवकांशी चर्चा करून नव्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करतील. उर्वरित कालावधीत महापौरपदासाठी कितीजणांना संधी द्यायची, हेही निश्चित नाही. कदाचित एक अथवा दोघांनाही संधी मिळू शकते, पण हा निर्णय नेतेमंडळीच घेतील, असे गटनेते जामदार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वर्षभरात दोनजणांना महापौरपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा सत्ताधारी गटात सुरू झाली आहे.
नेत्यांचा आदेश येताच राजीनामा देणार
By admin | Published: January 08, 2015 11:16 PM