मल्हारपेठ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची मंजुरी मिळूनही वनविभागाच्या परवानगीनंतरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे रस्ते महामंडळाकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांतून ‘गणेवाडी, तुझा कधी संपणार वनवास गं..’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पाटण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर बसलेले गणेवाडी हे छोटेसे गाव. गावात आजही फक्त कमी माल घेऊन जाणारा डम्पिंग ट्रॅक्टर व दूध वाहतूक करणारी तीनचाकी व दुचाकी गाडी वर-खाली करत आहे. गेल्या पंधरा वर्षांत गणेवाडी रस्त्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. मोठे राजकारणही झाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नोव्हेंबर २०१८ मध्ये साडेपाच किलोमीटर गावाच्या रस्त्याला मंजुरी मिळाली. तर गत महिन्याच्या सुरुवातीलाच या कामासाठी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयाने विरोध दर्शविला आहे.वनखात्याच्या हद्दीतून रस्ता जात असल्याने वनविभागाची परवानगी घ्या. मगच काम सुरू करू, असे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने पुन्हा खडतर प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.गणेवाडीतील ग्रामस्थांच्या व्यथेचा विचार केल्यास या गावातून दहा वर्षांपूर्वी झोळी किंवा डोलीतून आजारी व्यक्तींला मल्हारपेठ येथे डोंगर उतरून उपचारासाठी आणावे लागत होते. त्याकडे लक्ष देत माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी गत पंचवार्षिकमध्ये तांबेवाडीकडून रस्त्याचे काम केले. तर आमदार शंभूराज देसाई यांनीही गणेवाडीच्या बाजूने काम केले आहे. मात्र, सध्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. जोपर्यंत शासनाची मंजुरी असूनही जोपर्यंत वनविभागाकडून मंजुरी मिळत नाही. तोपर्यंत ग्रामस्थांना खडतर प्रवास करावा लागणार आहे.विद्यार्थ्यांचा प्रवास खडतरगणेवाडीत सातवीपर्यंत शाळा आहे. आठवीनंतरच्या शिक्षणासाठी आजही मुलांना उरूल किंवा मल्हारपेठ येथे दररोज डोंगर चढ-उतार करून चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मल्हारपेठ येथील शाळेत चार मुली व तीन मुले दररोज डोंगर चढ-उतार करून येत आहेत. रस्ता नसल्यामुळे आणखी किती दिवस शिक्षणासाठी ही शिक्षा भोगावी लागणार?, असा प्रश्न विद्यार्थ्यांतून विचारला जात आहे.
मूलभूत गरजांसाठी ग्रामस्थांची दमछाकगणेवाडीची लोकसंख्या पाचशे असून, वाडीत ८० कुटुंबे आहेत. कामधंदा नसल्यामुळे अनेक कुटुंबे व त्यातील लोक मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरात आहेत. गावात पाणी, वीज, रस्ता, आरोग्य, शिक्षण या गरजेच्या गोष्टी मिळविण्यासाठी आजही ग्रामस्थांची दमछाक होत आहे.
स्मशानभूमीअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कारगणेवाडी गाव ठोमसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, पहिल्यांदा गणेवाडी येथील महिला सरपंच झाली होती. त्यांनी गावात अंतर्गत सिमेंट रस्ते केले आहेत. मात्र गावात पाणी, आरोग्य, गटारांची सोय नाही. स्मशानभूमीही नाही. त्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
गणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टरची अशी अवस्था होत आहे. तर दुचाकी व तीनचाकी वाहनाची काय अवस्था होत असेल?, यावरून दिसून येते.