सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. हा रस्ता केंद्र शासनाच्या निधीतून होणार असला तरी टोलची आकारणी होणार आहे. त्यासाठी कसबेडिग्रज ते तुंग या दोन गावादरम्यान टोल वसुली नाका उभारला जाणार आहे. दरम्यान, सांगली महापालिका हद्दीपासून टोलनाका पाच किलोमीटरवर असल्याने त्याला विरोध होऊ लागला आहे.सांगली - पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ६११ कोटींची निविदेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. अर्थ समितीच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. या रस्त्यावर दहा ठिकाणी लहान-मोठे पूलही बांधले जाणार आहे; पण सेवा रस्ता, भूसंपादनासाठी कसलीही तरतूद केली नाही. या रस्त्यावर कसबेडिग्रज ते तुंग दरम्यान टोलनाका उभारला जाणार आहे. प्रकल्प आराखड्यात पेठपासून ३३.८५ किलोमीटरवर हा टोलनाका दर्शविला आहे.पण, सांगली महापालिकेच्या हद्दीपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर हा टोलनाका येत आहे. राष्ट्रीय महामार्ग कर वसुली नियम २००८ नुसार पालिका क्षेत्रापासून दहा किलोमीटर अंतराच्या बाहेर टोलनाका अपेक्षित आहे. पण, इथे त्यापेक्षाही कमी अंतर दिसते. त्यामुळे टोलनाका विरोध होऊ शकतो. सर्वपक्षीय कृती समितीने रस्त्याच्या एकूण लांबीच्या मध्यवर्ती ठिकाणी टोलनाका घ्यावा, अशी मागणी केली.पेठ नाका ते मिरज या राष्ट्रीय महामार्गावर पाच ते सहा ठिकाणी अति तीव्र धोकादायक वळणे आहेत. चौपदरीकरण करीत असताना अति धोकादायक तीव्र वळणे, ब्लाइंड स्पॉट्स, ॲक्सिडेंट स्पॉट्स काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.मध्यवर्ती ठिकाणी नाका करण्याची मागणीपेठ नाका ते मिरज या दरम्यानच्या एकूण ५५ किलोमीटरपैकी सांगलीपर्यंत ४१ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. सांगली ते मिरज हे १३.७५ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरणात समावेश करावा. सांगली बायपासलगत अत्याधुनिक ट्रक टर्मिनल सुविधा विकसित करण्यात यावी, आदी मागण्या केल्या आहेत. सांगलीजवळ टोलनाका करण्यापेक्षा तो मध्यवर्ती ठिकाणी करावा, यासाठी पाठपुरावा करू, असे कृती समितीचे सतीश साखळकर, महेश पाटील यांनी सांगितले.
सांगली-पेठ चौपदरीकरणानंतर कसबे डिग्रजजवळ टोल नाका, नाक्याला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:40 PM