लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : सांगलीतून आठवडाभरात दुसऱ्यांदा अवयवदान घडले. त्यासाठी सकाळीच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. नितीश कुमार पाटील (वय ३२, रा. दानोळी, जि. कोल्हापूर) याच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्याचे अवयवदान केले. यामुळे आठ ते दहा जणांना जीवदान मिळाले.
नितीशला बाराव्या वर्षापासून फिटचा त्रास होता. गेल्या रविवारी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला. या धक्क्यातून सावरत नातेवाइकांनी अवयवदान केले.
हृदय विमानाने मुंबईला
मुंबईतील जसलोक रुग्णालयात एका रुग्णाची हृदयशस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यासाठी नितीशचे हृदय कोल्हापुरातून विमानाने मुंबईला पाठविण्यात आले. तर दोन मुत्रपिंडे पुण्यातील बिर्ला व सह्याद्री रुग्णालयांना पाठविण्यात आली. यकृत रुबी रुग्णालयाकडे रवाना झाले. डोळे व त्वचा सांगलीतील रुग्णालयात देण्यात आली.