हणमंत पाटीलसांगली : गेल्या १० वर्षांत सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे अकाली निधन झाल्याने राजकीय पोकळी निर्माण झाली. ‘ही पोकळी भरून काढण्याचे आव्हान’ नव्या पिढीतील युवा नेत्यांपुढे असल्याचा ‘लोकमत जागर’ ५ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. त्यानंतर अनेक वाचकांचे फोन आले. या दिग्गज नेत्यांची नवी पिढी राजकीय वारसदार म्हणून पुढे येत आहे. हे युवा नेते केवळ वारसदार म्हणून सरस ठरणार का, त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल? याचा घेतलेला आढावा.
सांगली जिल्ह्याला स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचा राजकीय वारसा आहे; परंतु त्यानंतरच्या चार दशकात म्हणजे १९८५ ते २०२५ या काळात सांगलीचा एकही नेता मुख्यमंत्री होऊ शकला नाही. दरम्यान, २००४ ते २००८ या काळात आर. आर. पाटील आपल्या स्वकर्तत्वावर उपमुख्यमंत्री झाले; परंतु आर. आर. पाटील व डॉ. पतंगराव कदम यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. सांगलीचा नेता मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आव्हान आता नव्या पिढीपुढे आहे.आपल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्याशी असलेली बांधीलकी कायम जपावी लागेल. केवळ राजकीय वारसदार म्हणून पुढील काळातील सुशिक्षित युवा मतदार तुम्हाला स्वीकारलेच असे नाही. जुन्या पिढीतील नेत्यांची सहानुभूती म्हणून तुम्हाला मतदारराजा एकदा संधी देईल; परंतु पुढील राजकीय वाटचाल तुम्हाला स्वकर्तृत्वावर करावी लागेल.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर युवानेते डॉ. विश्वजित ऊर्फ बाळासाहेब कदम यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली; परंतु त्यांची पुढील वाटचाल जनतेच्या विश्वासावर सुरू आहे. २०१९ च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. पुढील काळात युवा नेत्यांना राजकीय क्षेत्रातील पोकळी भरून काढण्याची मोठी संधी व आव्हान आहे.
वसंतदादा पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून तिसऱ्या पिढीतील युवानेते विशाल पाटील हे जनतेसमोर जात आहेत. गतपंचवार्षिक सांगली लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. तरीही ते खचून गेले नाहीत. आता केवळ राजकीय वारसदार म्हणून नाही, तर पुढील काळात स्वकर्तृत्व सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.आर. आर. आबा यांचे वारसदार म्हणून युवा नेते रोहित पाटील तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघाबरोबर राज्यभर फिरत आहेत. आबांच्या खास शैलीतील भाषणांना सोशल मीडियामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय; परंतु जनतेच्या मनातील आबांची प्रतिमा पाहता वारसदार ठरताना रोहित पाटील यांना स्वकर्तृत्व दाखवावे लागेल. त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे. कारण जेवढा मोठा राजकीय वारसा, तेवढं मोठे आव्हान व तितकीच संधी या युवा नेत्यांपुढे आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून सत्यजित देशमुखराजकारणात आले. त्यांची वाटचाल जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून सुरू आहे. शिराळा विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. सध्या त्यांच्याकडे भाजपच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची प्रचारप्रमुख म्हणून धुरा आहे.राजकारणातील प्रदीर्घ अनुभव व जनतेशी नाळ असलेले आमदार अनिल बाबर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्याचा राजकीय वारसदार म्हणून सुहास बाबर यांचे नाव पुढे येत आहे. सुहास यांना जिल्हा परिषद सदस्य ते उपाध्यक्ष म्हणून राजकीय वाटचालीचा अनुभव आहे. अनिल भाऊ यांची सहानुभूती असली तरी पुढील काळात त्यांना स्वकर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे. दिग्गज नेत्यांच्या राजकीय वारसदारांना केवळ आपल्या मतदारसंघापुरता संकुचित विचार करून चालणार नाही. जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या विकासाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल करावी लागेल.