मिरज : मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याचा प्रस्ताव पुन्हा शासनाने मागवला आहे. मिरज पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना महसुली कामासाठी मिरजेला येणे गैरसोयीचे असल्याने, स्वतंत्र सांगली तालुक्याची प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा दिल्यानंतर आता स्वतंत्र सांगली तालुक्याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. प्रशासकीय सोयीसाठी बहुसंख्य ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणीच तालुका प्रशासन आहे. मात्र सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण मिरज तालुक्यात आहे. ७२ गावे आणि ६ लाख ५० हजार लोकसंख्या असलेल्या मिरज तालुक्यात मिरज, सांगली व इस्लामपूर असा अडीच विधानसभा मतदारसंघ आहे. नदीकाठचा पश्चिम भाग व कर्नाटक सीमेवरील पूर्व भागात मिरज तालुका विभागला आहे. महसुली कामे व शासकीय, शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले दाखले मिळविण्यासाठी पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना मिरजेला यावे लागते. केवळ सांगली शहरातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. स्वतंत्र सांगली तालुका झाल्यास पश्चिम भागातील ग्रामस्थांची सोय होऊन, मिरजेतील प्रशासकीय ताण कमी होणार आहे. मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्यासाठी तहसीलदारांसह अन्य अधिकारी कर्मचारी व इमारत, वाहनांसाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. विजयनगर येथे नवीन प्रशासकीय इमारतीत जागा मिळाल्यास तालुका कार्यालय लगेच सुरू करता येणे शक्य असल्याचा प्रस्ताव प्रशासनाने पाच वर्षापूर्वीच शासनाकडे पाठविला आहे. मिरज तालुक्यातील आठ मंडल विभागांपैकी मिरज आरग, मालगाव, कवलापूर हे मिरज तालुक्यात व सांगली, कसबे डिग्रज, बुधगाव, कवलापूर हे मंडल विभाग सांगली तालुक्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. मिरज पश्चिम भागात नदीकाठावर पूरपरिस्थिती व पूर्व भागातील दुष्काळ, टंचाईबाबत प्रशासनाला उपाययोजना करावी लागते. गेली ३० वर्षे स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी प्रलंबित आहे. आ. सुरेश खाडे यांनी याबाबत विधानसभेतही मागणी केली, मात्र याबाबत निर्णय झाला नाही. मिरज तालुका विभाजनाबाबत वारंवार माहिती मागविण्यात येते, मात्र शासनदरबारी प्रस्ताव दाखल होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतरही स्वतंत्र सांगली तालुक्याबाबत निर्णय झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यात आल्यानंतर आता पुन्हा मिरज तालुका विभाजनाबाबत माहिती मागविण्यात आल्याने स्वतंत्र सांगली तालुक्याबाबत निर्णयाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)प्रस्तावित सांगली तालुक्यातील गावेसांगली, अंकली, सांगलीवाडी, हरिपूर, कसबे डिग्रज, समडोळी, मौजे डिग्रज, तुंग, दुधगाव, सावळवाडी, मोळा, कुंभोज, माळवाडी, कवठेपिरान, शेरी कवठे, बुधगाव, कुपवाड, वानलेसवाडी, बामणोली, कर्नाळ, पद्माळे, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी, माधवनगर.
स्वतंत्र सांगली तालुक्याबाबत पुन्हा प्रस्ताव
By admin | Published: April 08, 2016 11:39 PM