सांगली : जिल्ह्यातील गावांमध्ये वारंवार दूषित पाण्याचे नमुने आढळून येऊनही त्यावर ग्रामपंचायतीचे प्रशासन ठोस उपाययोजना करीत नाही. जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडूनही दूषित पाणीपुरवठा करणार्या ग्रामपंचायतींवर कडक कारवाई होत नसल्यामुळे प्रत्येक महिन्याला पाणी नमुने तपासणीत त्याच त्या गावांची नावे येत आहेत. एप्रिल पाणी नमुने तपासणीत तर सर्वाधिक शंभर गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असून, लाखो ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे आजारांचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनासह जिल्ह्यातील मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील एक हजार ५३१ ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले होते. यापैकी शंभर गावातील १७४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये अनेक मोठी गावे असूनही तेथील दूषित पाणी पुरवठ्याकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत आहेत. आटपाडी तालुक्यातील कौठुळी, देशमुखवाडी, आटपाडी, भिंगेवाडी, बोंबेवाडी, लेंगरेवाडी, हिवतड, बाळेवाडी, तडवळे, गोमेवाडी, मानेवाडी, काळेवाडी, खरसुंडी, नेलकरंजी, औटेवाडी, वलवण, जत तालुक्यातील बेळुंखी, कुडणूर, अंकली, खैराव, टोणेवाडी, सोरडी, आसंगी, जाडरबोबलाद, लमाणतांडा, खंडनाळ, कुंभारी, धावडवाडी, वायफळ, बागलवाडी, मोकाशेवाडी, रेवनाळ, काराजनगी, पाच्छापूर, रावळगुंडवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, मळणगाव, आरेवाडी, घोरपडी, नागज, रायवाडी, ढालेवाडी, दुधेभावी, सिध्देवाडी, कदमवाडी, इरळी, जांभूळवाडी, निमज, चुडेखिंडी, ढोलेवाडी, अलकूड एम, कोकळे, करलहट्टी, कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग, मिरज तालुक्यातील आरग, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, पायापाचीवाडी, शिपूर, एरंडोली, बुधगाव, कवलापूर, खरकटवाडी, रसूलवाडी, इनामधामणी, पलूस तालुक्यातील सावंतपूर, दह्यारी, शिराळा तालुक्यातील शिराळा, सागाव, आरळासह १६ गावे, तासगाव तालुक्यातील बोरगाव, डोंगरसोनीसह आठ गावे, वाळवा तालुक्यातील भडकंबे, येलूर, पेठ, शिरगावसह १४ गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. येथील पाण्यामध्ये टाकण्यात येणारी टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची असल्याची स्पष्ट झाले आहे. नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दूषित पाण्याचे नमुने असणार्या गावांना नोटिसा बजाविल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत कधीच त्या गावांवर कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)
पुन्हा शंभर गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित
By admin | Published: May 13, 2014 12:43 AM