अशोक पाटील - इस्लामपूर -जयंत पाटील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाले. परंतु ‘नवे सरकार नवा खेळ’ यामुळे स्वत:च्या मतदारसंघातील नियोजित विकास कामांना लागणारा निधी त्यांना सहजासहजी उपलब्ध होणार नाही. यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. सत्तास्थानी असताना केलेल्या विकास कामातही त्यांच्या काही बगलबच्च्यांनी हात धुऊन घेतले आहेत. तेच आता वेगळी भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे आगामी राजकारणात जयंत पाटील यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी ‘वसा जनसेवेचा’ या मथळ्याखाली केलेल्या विकास कामांची पुस्तिका प्रकाशित केली होती. त्याचे वितरणही मतदारांना केले होते. त्यातील बहुतांशी विकासकामे मार्गी लागली आहेत. जयंत पाटील यांना आता बराच वेळ आहे. त्यामुळे त्यांनी झालेल्या विकास कामांची पाहणी करुन त्याचा सर्व्हे करावा, अशीही मागणी होत आहे. शहरातील भुयारी गटारी व रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचा गवगवा करणाऱ्या इस्लामपूर नगरपालिकेने या कामांचा प्रारंभही केलेला नाही. शहरातील रस्त्यांची अवस्था आणि वाहतुकीची कोंडी सर्वसामान्यांना जीवघेणी ठरत आहे. सत्ताधाऱ्यांकडून याचेही नियोजन झालेले नाही. केलेल्या विविध विकास कामात झालेला निकृष्टपणा विरोधकांनी चव्हाट्यावर आणला आहे. याचीही दखल न घेता शहरातील रस्ते बनविण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचेच उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते मंगळवारी होणार आहे. या निधीचा दुरुपयोग होऊ नये याचीही खबरदारी घेतल्यास चांगल्या दर्जाचे रस्ते तयार होतील. जेणेकरून इस्लामपूरची बारामती करण्यास सुरुवात होईल, अशीही भावना व्यक्त होत आहे.आत्मपरीक्षणाची गरज?इस्लामपूर शहरातील घरकुल योजना, आष्टा नाक्यावरील आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव, बोटिंग क्लब यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. परंतु या कामात त्यांच्या बगलबच्च्यांनी चांगलेच हात धुऊन घेतले असल्याने, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अशीच अवस्था इस्लामपूर मतदारसंघातील बहुतांशी विकास कामात झाली आहे. याचीही पाहणी जयंत पाटील यांनी करून आत्मपरीक्षण करावे, अशी मागणीही होत आहे.
जयंतरावांसमोर आता निधीसाठीचे आव्हान
By admin | Published: November 03, 2014 10:38 PM