लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्य शासनाच्या सूचनांचा वेगळा अर्थ लावून महापालिकेतील काही मंडळींनी दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरणाचा घाट घातला आहे. येत्या महासभेत तसा ठराव झाल्यास तो हाणून पाडू, असा इशारा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला. भाजपकडून दारूबाजांना कधीही पाठबळ दिले जाणार नाही. भविष्यात शासनाने हस्तांतरणाबाबत एकतर्फी निर्णय घेतला तरी त्याला विरोध करू, असेही त्यांनी सांगितले. दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरणाच्या हालचाली महापालिकेत सुरू आहेत, त्याबाबत आमदार गाडगीळ यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावर ५०० मीटर अंतरात दारूबंदी केली आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील ९० टक्केपेक्षा अधिक दारू दुकाने बंद झाली आहेत. न्यायालयाने घेतलेला हा निर्णय जनतेच्या हिताचा आहे. आता काही भानगडबाजांकडून शासनाचा आदेश आणि शासनाच्या महसुलाची काळजी करीत रस्ते हस्तांतरण ठराव महासभेत घुसडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या भानगडींना भाजप कधीही थारा देणार नाही. व्यसनाधिनता आणि दारू विक्रीला आमचा ठाम विरोध आहे. भाजपचे सर्वच नगरसेवक महासभेत त्याला कडाडून विरोध करतील. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई उभी केली जाईल. रस्ते हस्तांतरणासाठी महापालिका ठरावाची गरज नसून, आयुक्तांनी पत्र दिल्यास रस्त्यांचा ताबा देण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत गाडगीळ म्हणाले की, त्यालाही आमचा विरोधच आहे. महापालिका आयुक्तांनी तसे कोणतेही पत्र देऊ नये. तसा प्रकार घडला तरी शासनाला आम्ही याबाबत कळवू. परस्पर रस्ते हस्तांतरणाचा निर्णय शासन घेणार नाही. एकतर्फी निर्णय घेतला तर पक्ष म्हणून त्याला विरोध करू. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, समन्वयक मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मुन्ना कुरणे, प्रदेश सदस्य प्रकाश बिरजे, नगरसेविका स्वरदा केळकर, वैशाली कोरे, पांडुरंग कोरे, शरद नलावडे, गणपतराव साळुंखे, संजय कुलकर्णी उपस्थित होते. महापालिकेचे काही रस्ते दुबारआमदार फंडातून सांगली व कुपवाड हद्दीत ३० कोटींची कामे होणार आहेत. महापालिकेकडून १४० कामे तपासून सहा महिन्यांपूर्वीच या कामासाठी ना-हरकत घेतली आहे. पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होईल. त्या कामांचा जागेवर छायाचित्रांसह तपासूनच निर्णय घेतला होता. आता जिल्हा सुधार समितीने दुबार कामांचा आरोप केला आहे. यासंदर्भात महापालिकेला शहानिशा करण्याचे आदेश दिले असून, दुबार कामे असतील तर ती महापालिकेने रद्द करावीत. त्याऐवजी दुसऱ्या कामांचा समावेश करावा, असेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले. खासदारच उत्तर देतीलखासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी दारूसाठी रस्ते हस्तांतरणाचा ठराव करण्यासाठी नगरसेवकांना आमिषे दाखविली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक गौतम पवार यांनी केला होता. याबद्दल ते म्हणाले की, दारूसाठी रस्ते हस्तांतरणाबाबत ते महापालिकेत आल्याची चर्चा झाली. त्यावेळीच त्यांनी त्याचा खुलासा केला होता. रस्ते हस्तांतरणाला त्यांचाही विरोध असल्याची भूमिका त्यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. तरीही राजकीय हेतूने जे आरोप झाले, त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. त्याचे उत्तर खासदार संजयकाका पाटील स्वत:च देतील.
रस्ते हस्तांतरणाविरुद्ध सुधीर गाडगीळ मैदानात
By admin | Published: May 17, 2017 11:20 PM