ओळ : ऐनवाडी येथील अगस्ती विद्यालयात माजी विद्यार्थी व बाजार समितीचे नूतन सभापती बापूराव शिंदे यांचा अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संतोष नाईक यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
विटा : ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांची नेहमीच वानवा असते. परंतु, खानापूर पूर्व भागातील ऐनवाडी येथील अगस्ती विद्यालयाने त्याची उणीव भरून काढली आहे. अत्यंत डोंगरी भागातील हे विद्यालय आदर्श पिढी घडविण्यात मोठे योगदान देत असल्याचे गौरवौद्गार अगस्ती विद्यालयाचे माजी विद्यार्थी व नाशिकस्थित उद्योजक सुरेश जगदाळे यांनी काढले.
ऐनवाडी (ता. खानापूर) येथील अगस्ती विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात उद्योजक जगदाळे बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव शिंदे, मुख्याध्यापक संतोष नाईक उपस्थित होते.
यावेळी सभापती बापूराव शिंदे यांनी ऐनवाडी या छोट्याशा खेड्यात अगस्ती विद्यालयाने बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. शाळेचा परिसर व शैक्षणिक सुविधा पाहता या विद्यालयाने शैक्षणिक क्रांती घडविली असल्याचे सांगून अध्यक्ष जाधव व मुख्याध्यापक संतोष नाईक यांच्या कामाचे कौतुक केले, तर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी अगस्ती विद्यालय अनेक अडचणींतून मार्गक्रमण करीत असताना पालक व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे सांगितले.
प्रारंभी विद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योजक सुरेश जगदाळे, बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थी बापूराव शिंदे यांचा अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सहायक शिक्षक कबीर यांनी केले. आभार शिक्षक शिवशरण यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.