सातारा : मुंबईतील मोर्चापूर्वी सरकारला आपली ताकद दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मराठा बांधव एकवटला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘प्रत्येक मराठ्याचे एकच काम... ३१ जानेवारीला हायवे जाम..!’ असा नारा देत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक मराठा बांधव चक्का जाम आंदोलनात सहभागी होण्यासाठी मंगळवार, दि. ३१ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरणार आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’च्या वतीने पुकारण्यात आलेला अहिंसावादी लढा आता अनोख्या टप्प्यावर आला आहे.सातारा जिल्ह्यात पुणे-बेंगलोर महामार्ग त्याचबरोबर तालुक्यातील प्रमुख ठिकाणी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने मंगळवार, दि. ३१ जानेवारी रोजी जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव नेमून दिलेल्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून, कोणत्याही परिस्थितीत आणि शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्यासाठीची आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती ‘सकल मराठा समाजा’च्या वतीने देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी ‘सकल मराठा समाज’ आणि ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’चे संयोजक प्रतिनिधी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना भेटले आणि त्यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. चक्का जाम आंदोलनाची आचारसंहिता, चक्का जाम आंदोलनात नेमके काय करणार यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, चक्का जाम आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावरही लक्ष देण्याची विनंती पोलिस अधीक्षक पाटील यांनी ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ संयोजकांना केली. याचवेळी साताऱ्यात झालेल्या मोर्चावेळी मराठा बांधवांनी दाखविलेल्या संयमाचेही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक करत चक्का जाम आंदोलनातही सहकार्य करण्याची विनंती केली. लोकप्रतिनिधी अन् इच्छुकांनाही दिला इशारासातारा जिल्ह्यात ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’च्या वतीने होणाऱ्या चक्का जाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांना करण्यात आले आहे. यावेळी जर कोणी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणारा उमेदवार अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले अथवा चक्का जाम आंदोलनात कोठे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मराठा समाजाने मतदान करू नये, असा निर्णय साताऱ्यात प्रजासत्ताक दिनी झालेल्या चक्का जाम आंदोलन पूर्वतयारीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येथे होईल चक्का जामशिरवळ -शिरवळ चौक, खंडाळा -पारगाव चौक, पाचवड -आनेवाडी टोलनाका, सातारा- वाढे फाटा, उंब्रज -तळबीड टोलनाका, दहिवडी-पिंगळी चौक, कऱ्हाड- कोल्हापूर नाका, पुसेगाव- शिवाजी चौक, कोरेगाव- आझाद चौक, रहिमतपूर- रहिमतपूर चौक, फलटण- फलटण चौक, लोणंद- बसस्थानकासमोर, वाठार रस्त्यावरच, मेढा बाजार चौक, पाटण- जुने स्टँड, वाई- बावधन नाका, वडूज- वडूज चौक, म्हसवड- म्हसवड चौक.
‘सकल मराठा’तर्फे ३१ रोजी चक्का जाम आंदोलन
By admin | Published: January 27, 2017 11:21 PM