सांगली : ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी मिळावी, साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवार, दि. २५ रोजी जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यातूनही ठोस निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन आक्रमक करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.खराडे म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसाठी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. एकरकमी एफआरपी द्यावी, दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा कायदा रद्द करा, साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत, ऊस तोडणी मजुरासाठी गोपीनाथ मुंडे महामंडळ तयार करा, ऊस वाहतूकदारांना गंडा घालणाऱ्या मजुरांचा शोध घेण्यासाठी राज्यव्यापी पोलिस पथक तयार करा, साखरेची किंमत ३५ रुपये करा, इथेनॉलचे भाव ६५ रुपये, तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नवा कायदा करा, उताऱ्यातील चोरी थांबवा आदी मागण्यांसाठी ऊसतोडी बंद आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दहापासूनच जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, जगनाथ भोसले, राम पाटील, राजेंद्र माने, बाळासाहेब जाधव, शिवाजी पाटील, दामाजी डुबल, रमेश माळी, ॲड. सुरेश घागरे, तानाजी धनवडे आंदोलनाची तयारी करीत आहेत.येथील रस्ते रोखणारजिल्ह्यात इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, इस्लामपूर, शिराळा, तासगाव, कडेगाव, पलूस, वसगडे, जत, विटा, कवठेमहांकाळ, म्हैसाळ उड्डाणपूल आदी ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. हे आंदोलन सर्वत्र सकाळी १० वाजता होणार आहे, असे खराडे म्हणाले
'स्वाभिमानी'तर्फे उद्या चक्का जाम, एकरकमी एफआरपीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:22 PM