लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ मिळावी, यासाठी केलेले आंदोलन अखेर वेतनवाढ न मिळवताच शनिवारी मागे घेतले. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले, तर पर्यायी व्यवस्था करून सरपंच वृषाली पाटील यांनी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मोहीम सुरु केली आहे.
आटपाडीमध्ये १२ दिवसांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, आंदोलन मागे घेतल्याचे पत्र प्रसाद नलावडे, सुधीर भिंगे यांनी काढले आहे. त्याच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत. आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे सांगत लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीची जशी करवसुली होईल, त्याप्रमाणात पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे. परंतु, सरपंच किंवा इतरांनी असे कोणतेही लेखी किंवा तोंडी आश्वासन दिलेले नाही. यावेळी उपसरपंच डॉ. अंकुश कोळेकर, दत्तात्रय पाटील, रावसाहेब सागर उपस्थित होते.