सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील बोरगाव पथकर नाक्याच्या परिसरातील १० गावांना पथकर माफीसाठी शेतकरी कामगार पक्ष व स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. एक रुपयादेखील पथकर भरणार नाही, सक्ती केल्यास महामार्गावरील वाहतूक बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.शेकापचे नेते दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ॲड. अजित सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, रोहित पाटील, प्रा. बाबुराव लगारे, ॲड. सुभाष पाटील, अर्जुन थोरात यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावरील बोरगाव पथकर नाक्याच्या २० किलोमीटर परिघातील गावांना संपूर्ण पथकर माफी द्यावी. रहिवाशांना दिवसभरात अनेकदा नाका ओलांडावा लागतो. त्यांनी प्रत्येकवेळी पथकर भरणे अन्यायकारक आहे. मासिक पासची सोय असली, तरी दरवर्षी त्याची शुल्कवाढ होते. त्यामुळे तो भरणे शक्य नाही. आंदोलकांच्या मागण्या अशा : महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. खरशिंग फाटा उड्डाण पूल, शिरढोण येथे अग्रणी नदीवर दोन्ही बाजुंना तसेच नरसिंहगाव, अलकुड (एम) येथे सेवा रस्ते, गतिरोधक, महामार्गालगतच्या गावांच्या नावांचे फलक, गावांत जाणारे रस्ते, अपूर्ण गटारी यांचीही कामे पूर्ण करावीत. विठ्ठलवाडी येथील उड्डाण पूल उभारावा. आंदोलनात अरुण भोसले, शशिकांत कदम, प्रशांत कदम, प्रल्हाद गायकवाड, शरद पवार, प्रसाद खराडे, विश्वास साखरे, प्रशांत यादव, सचिन करगणे आदींनी भाग घेतला.
अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळले नाहीमागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व आंदोलकांमध्ये बैठक झाली होती. अधिकाऱ्यांनी कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, पण कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सांगलीत सोमवारी आंदोलन झाले.