सांगली : 'मी फास्टफुड विक्रेता , मला कोणी न्याय देईल का?' असे फलक हातात घेऊन, तोंडाला काळे मास्क लावून सोमवारी शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शहरात व्यवसायाच्या ठिकाणी या विक्रेत्यांनी अनोखे आंदोलन केले.कोरोनामुळे शहरातील हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्री १८ मार्चपासून बंद करण्यात आली. फास्टफुड विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली. महापालिका हद्दीत जवळपास पाच हजार फेरीवाले आहेत. त्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. सध्या शासनाने लॉकडाऊनच्या नियमात काही शिथिलता दिली. पण खाद्यपदार्थ विक्रेत्यावरील व्यवसाय बंदी अजूनही कायम आहे.
सांगली शहर फास्ट फुड विक्रेते हातगाडी असोसिएशनच्या वतीने जिल्हा व महापालिका प्रशासनाकडे हॉटेल व्यवसायिकाप्रमाणे पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. पण प्रशासनाने त्याला मान्यता दिली नाही. सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील हे जिल्हा दौर्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होती.
पालकमंत्री व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विक्रेत्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीच हातात फलक व काळे मास्क लावून आंदोलन केले. चौकट पालकमंत्र्यांकडून दखल असोसिएशन अध्यक्ष संदीप टेंगले म्हणाले की, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली.
विक्रेत्यांच्या आंदोलनाबाबत पालकमंत्र्यांची भेट घेतली. हातगाडे सुरू करण्याबाबत जिल्हा पातळीवर निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी शासनाकडे स्वत: पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच आयुक्तांना प्रायोगिक तत्वावर पार्सल सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याची सूचनाही केली आहे.