अण्णा खोत- मालगाव (ता. मिरज) येथे पश्चिम महाराष्ट्रातले पहिले कृषी पर्यटन केंद्र आधुनिक पध्दतीने साकारण्यात येत आहे. सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या पर्यटन केंद्राच्या कामांची कृषी विद्यापीठ, शासनाच्या कृषीतज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पर्यटनस्थळात विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.मालगाव येथे शेतकऱ्यांनी अभिनव भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया गट स्थापन केला आहे. या गटाच्या माध्यमातून अशोक तवटे यांच्या १६ एकर जमीन क्षेत्रात शासनाच्या सहकार्यावर कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. १६ एकर जमिनीत सेंद्रीय खतावर द्राक्ष, चिक्कू, आंबाबाग, भाजीपाला, पानमळा, आधुनिक पध्दतीच्या गुऱ्हाळाच्या माध्यमातून सेंद्रीय गूळ, काजू प्रक्रिया हे उद्योग उभारण्यात आले आहेत. ग्रीन हाऊससाठी प्रयत्न सुरू आहेत. निवास, भोजन व्यवस्थेबरोबर पाऊण एकरात काढण्यात आलेल्या छोट्या तलावात नौकाविहाराची सोय करण्यात येणार आहे. दर महिन्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवीन संशोधन, रोगराईवर उपायांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा व मार्गदर्शनासाठी मोहीम राबविली आहे. प्रकल्पास विभागीय कृषी आयुक्त मनोज वेताळ, उपायुक्त चंद्रकांत जगताप, तालुका कृषी अधिकारी एच. एस. मेडीदार, कृषी पर्यवेक्षक प्रकाश फाळके, मंडल कृषी अधिकारी एम. के. वाघमोडे, तालुका कृषी अधिकारी व कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या पथकाने भेट दिली. यावेळी शैलेंद्र गाताडे व अशोक तवटे यांनी पर्यटन स्थळासाठी एकाच ठिकाणी उभारलेल्या द्राक्ष, आंबा, चिक्कू बागा, गुऱ्हाळ, काजू प्रक्रिया प्रकल्पांची माहिती दिली. अभिनव गटाचे शेतकरी यल्लाप्पा माळी, सुधाकर टोपकर, सुरेश दळवी, विलास बोधगिरे, अनिल वाघमोडे, राजाराम जाधव, शैलेश मालगावे उपस्थित होते.
मालगावात साकारणार कृषी पर्यटन केंद्र...
By admin | Published: December 11, 2014 10:36 PM