संतोष भिसे ।सांगली : लाल दिव्याची अपूर्वाई कधीच नसणाºया सांगली जिल्ह्याला भाजप सरकारमध्येही राज्यमंत्री आणि शेवटच्या टप्यात कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले. आता नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये किमान तीन मंत्रिपदांची आशा आहे. त्यामुळे सांगलीकरांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. शेतीला पाणी आणि हाताला रोजगार, या मूलभूत अपेक्षांची पूर्ती होणार काय, याकडे लक्ष असेल.
दुष्काळी पूर्व भाग व सधन प्ािश्चम भाग, अशी दुहेरी वाटचाल करणाºया या जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यांचे प्रश्न विविधांगी आहेत. त्यांचा अभ्यास असणा-या लोकप्रतिनिधींकडे आता सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. त्यामुळे या समस्यांवरची धूळ झटकली जाण्याची अपेक्षा आहे. महामार्गांचा विकास, सिंचन योजनांची पूर्तता, औद्योगिक वसाहतींचे पुनरुज्जीवन, शेतीमालासाठी हक्काच्या बाजारपेठा, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, दळणवळणाच्या सुविधा हे नेहमीचेच, परंतु दुर्लक्षित प्रश्न महाविकास आघाडी सोडवेल, अशी सांगलीकरांना अपेक्षा आहे.
‘मागणं लई न्हाई’ म्हणणाºया सांगलीकरांना फक्त पाणी आणि रोजगाराची साधने दिली तरी, जिल्ह्याचा विकासरथ गतिमान करण्याची धमक त्यांच्यात आहे. प्रश्न आहे तो या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचा. हीच अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम या, विकास कामांचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या नेत्यांकडून सांगलीच्या विकासात निश्चितच भर पडेल.