गोव्यात फोंडा येथे द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन गोवा पणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केले. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक जीवन पाटील, दुर्गाप्रसाद वैद्य आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे व्यावसायिक संबंध वृद्धिंगत होतील, असा विश्वास माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी व्यक्त केला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गोव्यात फोंडा येथे आयोजित द्राक्ष महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गोवा राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र पणन मंडळातर्फे महोत्सव आयोजित केला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून गोयंकरांसाठी सांगलीची दर्जेदार द्राक्षे या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गोवा पणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी उद्घाटन केले. यावेळी सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, लोकल फोंडा रेग्युलेशन समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद वैद्य आदी उपस्थित होते. वेळीप म्हणाले की, महाराष्ट्र आणि गोव्याचे संबंध नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून वृद्धिंगत होत आले आहेत. द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने अधिक सुमधुर होतील. महाराष्ट्रातील अन्य कृषी उत्पादनांसाठीही महोत्सवासारखे उपक्रम आयोजित करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. यावेळी दिनकर पाटील, संचालक जीवन पाटील यांनीही मार्गदर्शन केले. पणन मंडळाचे कोल्हापूर विभागीय उपसरव्यवस्थापक प्रकाश घुले यांनी प्रास्ताविक केले. हा महोत्सव २० ते २४ मार्च या कालावधीत चालणार आहे, त्यामध्ये तासगाव, मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ आदी तालुक्यांतील दर्जेदार द्राक्षे उपलब्ध करण्यात आली आहेत.