सांगली : कृषी विभागामार्फत मागासवर्गीय शेतकऱ्यांना योजना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. २ ऑक्टोबरपर्यंत यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.कृषी विभागामार्फत अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. पण सर्वच लाभार्थ्यांना विविध कारणांनी त्याचा लाभ मिळत नाही. आर्थिक परिस्थिती, दुर्गम भागात रहिवास, योजनांची माहिती नसणे आदी कारणांनी ते योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे योजनांचे उद्दिष्ट्य पूर्ण होत नाही. निधी परत जातो. सेवा पंधरवड्यात या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील.शेतकरी मेळावे, चर्चासत्रे, शिवार भेटी, पीक प्रात्यक्षिके, भित्तीपत्रके याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा प्रचार केला जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना योजनांच्या लाभासाठी तालुकानिहाय शिबिरे आयोजित करुन प्रस्तावांचा फॉर्म भरुन घेण्यात येतील. २ ऑक्टोबररोजीच्या ग्रामसभांतही माहिती देण्यात येणार आहे.या पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यात उपक्रमांचे आयोजन सुरु झाले आहे. अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध योजनांच्या लाभासाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी विभागातर्फे मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी कृषी सामाजिक सेवा पंधरवडा
By संतोष भिसे | Published: September 20, 2022 5:26 PM