महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला, आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का?; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

By अविनाश कोळी | Published: May 29, 2023 02:27 PM2023-05-29T14:27:13+5:302023-05-29T14:32:10+5:30

आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का?

Ahilya Devi statue removed from Maharashtra House, will Gopichand Padalkar protest, Congress leader Subhash Khot question | महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला, आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का?; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला, आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का?; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

googlenewsNext

सांगली : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आल्याने काँग्रेसच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत. भाजपचे व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे या गोष्टीचा निषेध करणार का, असा सवाल काँग्रेसचे नेते सुभाष खोत यांनी केला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खोत यांनी म्हटले आहे की, दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी केल्याचे आम्ही स्वागत करू, पण संपूर्ण देशामध्ये न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तुत्वशालिनींचे पुतळे हटवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अपमान केला आहे.

नेहमी महाराष्ट्रात आमदार गोपीचंद पडळकर मोठमोठ्या नेत्यांवर आगपाखड करत असतात, मग आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्यानंतर त्यांचे तोंड बंद का? पडळकर यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सरकारचा निषेध करावा.

त्यांनी राजीनामा नाही दिला, तर अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे महाराष्ट्र सदनातील पुतळे काढण्यास त्यांचीही मंजुरी आहे, अशी महाराष्ट्रातील अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले समर्थकांची खात्री होईल, असेही खोत यांनी म्हटले आहे.

Web Title: Ahilya Devi statue removed from Maharashtra House, will Gopichand Padalkar protest, Congress leader Subhash Khot question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.