लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होत आहे. या अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लवकरच समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले.
प्रभाग आठमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर सूर्यवंशी बोलत होते. महापौर सूर्यवंशी यांच्या हस्ते अहिल्यादेवी ज्ञानज्योतीचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक मान्यवरांच्या उपस्थितीत जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, सभापती पांडुरंग कोरे, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, साहाय्यक आयुक्त खरात, शेखर माने, माजी महापौर संगीता खोत, कल्पना कोळेकर, नसीमा नाईक, अर्पणा कदम, उर्मिला बेलवलकर, सविता मदने, मदिना बारुदवाले, धीरज सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार, गजानन आलदर, संजय यमगर, महेश सगरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास महापालिकेतील विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.