लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दरोडा, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील आठ जणाच्या टोळीवर मोकातर्गंत कारवाई करण्यात आली. या टोळीविरूद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. टोळीतील तीन जणांना अटक केली असून उर्वरित पाचजण अद्यापही फरार आहेत.
टोळीप्रमुख अनिल उर्फ अन्या युवराज पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), तुकाराम भीमराव घोरपडे (५४, रा. उंडेवस्ती, श्रीरामपूर, अहमदनगर), दाजी धनराज साळुंखे (३६, रा. द्वारकानगर, पाडेगाव, औरंगाबाद), कोंडीलाल काळे, बयबयी काळे. बंटू पिंपळे व काना अंकुश पवार (रा. कऱ्हेटाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या आठ जणांना मोक्का लावण्यात आला. यातील अनिल पिंपळे, तुकाराम घोरपडे व दाजी साळुंखे या तीन जणांना अटक केली होती.
सांगली, सातारा, रायगड, नागपूर, अहमदनगर, लातूर, औरंगाबाद तसेच छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यात या टोळीच्या कारवाया सुरू होत्या. २००१ पासून ही टोळी सक्रीय आहे. टोळीचे वर्चस्व टिकविण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी सुरू होती. खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, प्राणघातक शस्त्रासह हल्ला, घरफोडी असे गंभीर गुन्हे टोळीवर आहेत. या टोळीने राज्यात दहशत निर्माण केली. टोळीविरूद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी टोळीविरूद्ध मोकातर्गंत कारवाईसाठी पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून मोक्का कायद्यान्वये कारवाईला मंजुरी दिली. पुढील तपास उपअधिक्षक अजय टिके करीत आहेत. या कारवाईत एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक अभिजित देशमुख, सहाय्यक निरीक्षक समीर ढोरे, सहाय्यक फौजदार सिद्धाप्पा रुपनर, काॅन्टेबल दीपक गट्टे, रफिक मुलाणी, सचिन घाटके, गणेश कांबळे यांनी भाग घेतला.