दिलीप मोहिते --विटा --विटा ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदा इमारत व त्यानंतर विजेअभावी सुरू होऊ न शकलेले वातानुकूलित शवागृह आता लवकरच सुरू होणार असून, कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलेली वातानुकूलित शवागृहाची यंत्रसामग्री गुरुवारी विटा ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात आली. त्यामुळे हे शवागृह वीज कनेक्शनची पूर्तता झाल्यानंतर तातडीने सुरू होण्याचे संकेत आहेत. परिणामी, विटा शहरासह परिसरातील मृतदेहांची आबाळ आता थांबणार आहे. खानापूर तालुक्यातील अनेक लोक सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त परराज्यात स्थायिक झाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास नातेवाईकांना परराज्यातून येण्यास सुमारे १६ ते १८ तास लागतात. तोपर्यंत मृतदेह सुस्थितीत राहण्यासाठी खानापूर तालुक्यातील करंजे व विटा ग्रामीण रुग्णालयात तत्कालीन आ. सदाशिवराव पाटील यांच्या प्रयत्नातून वातानुकूलित शवागृहाला मंजुरी मिळाली. त्यातील करंजे ग्रामीण रुग्णालयात यापूर्वीच वातानुकूलित शवागृह सुरू झाले. परंतु, विट्यात इमारत नसल्याने येथील यंत्रसामग्री कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आली होती. विटा ग्रामीण रुग्णालयातील वातानुकूलित शवागृहासाठी वीज कनेक्शन घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात विट्यातील हे वातानुकूलित शवागृह सुरू होण्याचे संकेत आहेत. येथील वातानुकूलित शवागृह सुरू झाल्यानंतर विटा व परिसरातील मृतदेहाची आबाळ थांबणार असून, नातेवाईकांनाही करंजे येथे मृतदेह घेऊन जाण्यास लागणारा वेळ व पैसाही वाचणार आहे. ‘लोकमत’चा प्रभाव
विट्यातील वातानुकूलित शवागृह सुरू
By admin | Published: October 30, 2015 11:54 PM