ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे चिकुर्डे व ठाणापुढे येथे वारणा नदीला पूर आला आहे. ऐतवडे खुर्द ते निलेवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. चिकुर्डे ते वारणानगर जुन्या पुलावर जवळपास पाच फूट पाणी आले आहे. चिकुर्डे येथील नदीकाठावरील भोसले वस्ती व शिराळकर वस्तीतील लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते.
ढगेवाडी येथे पावसामुळे जनावरांच्या शेडची भिंत कोसळली. ढगेवाडी, जक्राईवाडी व डोंगरवाडी येथील तलाव भरून वाहत आहे. कार्वे येथील तलावाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
बुधवारी दुपारपासून परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द ते निलेवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. चिकुर्डे ते वारणानगर जुन्या पुलावरून पाच फूट पाणी जात आहे. चिकुर्डे येथील नदीकाठावरील भोसले वस्ती व शिराळकर वस्ती येथे पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागले आहे. त्यातच धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे येथील वस्तीला धोका निर्माण झाला आहे. लोकांना स्थलांतरित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मंडल अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी मोहन पाटील, पोलीस पाटील सुधीर कांबळे, तलाठी सोनाली चव्हाण व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी येथील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याबाबत सूचना केल्या. अनेक ठिकाणच्या ओढ्यावरील पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.