Sangli: अजितराव घोरपडेंच्या भूमिकेने खासदारांची पंचाईत, तासगाव-कवठेमहांकाळला उलटफेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:58 PM2024-10-21T18:58:56+5:302024-10-21T19:00:04+5:30
माजी खासदारांशी हातमिळवणीची शक्यता
दत्ता पाटील
तासगाव : लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या थेट विरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठबळ दिले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात उलटफेर झाला आहे. घोरपडे विधानसभेसाठी पुन्हा माजी खासदार पाटील यांच्याशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. घोरपडे यांच्या भूमिकेमुळे खासदार विशाल पाटील यांची पंचाईत होणार आहे. घोरपडे आणि संजय पाटील यांचे मनोमिलन झाल्यास, खासदार पाटील यांची गोची होणार आहे.
सलग दोन लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार संजय पाटील यांना पाठबळ दिलेल्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांच्या पराभवासाठी कंबर कसली होती. अपक्ष विशाल पाटील यांना रसद दिली होती.
महिनाभरापूर्वी सावर्डे येथे खासदार पाटील यांचा घोरपडे गटाच्यावतीने सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी ‘लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठीही घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही. संजय पाटील यांना पुन्हा वर येण्याची संधी द्यायची नाही, अशा शब्दांत इशारा देत खासदार पाटील यांनी घोरपडे यांना सोबत घेऊन रोहित पाटील यांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली होती.
लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील, असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला. संधी मिळेल तिथे विशाल पाटील यांनी संजय पाटील यांच्या विरोधात राजकीय संघर्षाची भूमिका घेतली होती. लोकसभेच्या पटावर कट्टर शत्रू असलेल्या माजी खासदारांसोबत, घोरपडे सरकारांनी जुळवून घेतल्याने विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य पातळीवर नाट्यमय घडामोडी
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार व घोरपडे गटाची लोकसभेसाठी झालेली एकजूट विधानसभेलादेखील कायम राहील, अशी चर्चा होती. मात्र, राज्य पातळीवर झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर, घोरपडे यांनी अनपेक्षितपणे माजी खासदारांसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे खासदार पाटील यांची चांगलीच पंचाईत झाल्याची चित्र आहे.
..तर कडू गोळी घ्यावी लागेल
अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ येथील मेळाव्यात ‘विधानसभेला आपला आमदार करायचा असेल, तर कडू गोळी घ्यावी लागेल’, असे वक्तव्य केले. दोन दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. घोरपडे यांनी रोहित पाटील यांना पाठबळ द्यावे, यासाठी खासदार विशाल पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.