जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा डाव; अजित पवार यांचा ग्राऊंड पातळीवर संपर्क तर भाजपचीही मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 05:02 PM2023-12-29T17:02:47+5:302023-12-29T17:03:17+5:30
बड्या नेत्यावर गळ
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदार संघाचे खंदे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्राऊंड पातळीवर संपर्क वाढविला आहे. अगोदरच भाजपचेही वरिष्ठ नेते लक्ष्य ठेवून आहेत. त्यामुळे २०२४ च्या नवीन वर्षात राष्ट्रवादीपुढे अर्थात जयंत पाटील यांच्यापुढे मोठे आवाहन उभे राहण्याचे संकेत आहेत.
जयंत पाटील यांनी राजकारणात मागे वळून पाहिलेच नाही. नेतृत्वाचा आलेख वाढवत इस्लामपूर-शिराळा मतदार संघातील सर्वच विरोधक नेस्तनाबूत केले. राज्यात देवेंद्रराज आल्यानंतर इस्लामपूर मतदार संघात भाजपकडून जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, विक्रम पाटील यांना ताकद दिली जात आहे. परंतु रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी राज्य मंत्री सदाभाऊ खोत ही ताकद टिकवू शकले नाहीत.
२०२३ च्या सरत्या वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आनंदराव पवार यांनी शिवसेनेची ताकद भक्कम केली. त्यातच हुतात्मा संकुलातील गौरव नायकवडी यांनी आपला सवतासुबा मजबूत करण्याचा डाव केला आहे. विरोधकांची फळी मजबूत होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘एन्ट्री’ने विरोधकांत अधिकच भर पडली आहे.
शिराळा मतदार संघातही अशीच अवस्था आहे. विद्यमान आ. मानसिंगराव नाईक यांना ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची ताकद मिळाली. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाडिक आणि देशमुख गटाला ताकद देण्याचा एक कलमी कार्यक्रम आखला आहे.
बड्या नेत्यावर गळ
उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदार संघात एका बड्या नेत्यावर गळ टाकून बसले आहेत. यासाठीच इस्लामपूर-शिराळा मतदार संघाच्या सीमारेषा लगत पुणे-बेंगलोर महामार्गावर साखर उद्योगातील मोठा प्रकल्प उभा करत जयंत पाटील यांना शह देण्याची खेळी सुरू केली आहे. एकंदरीत सरत्या वर्षात आणि येणाऱ्या नवीन वर्षातही जयंत पाटील यांच्यापुढे तगडे आव्हान उभे करण्याचा महायुती शासनाकडून राजकीय डाव सुरू आहे.