Sangli: ‘जिल्हा नियोजन’समितीमध्ये अखेर अजितदादा गटाला संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:11 PM2024-01-16T16:11:48+5:302024-01-16T16:12:57+5:30
सांगली : जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित’ म्हणून अखेर अजित पवार गटाला संधी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती ...
सांगली : जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित’ म्हणून अखेर अजित पवार गटाला संधी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीत समावेश नसल्याने दादा गटाने नाराजी दर्शवली होती. सोमवारी याबाबतचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, सनमडी (ता. जत) चे सुनील पवार आणि करगणी (ता. आटपाडी) च्या पुष्पा जयवंतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा निवड समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून पालकमंत्र्यांच्या शिफारशीने निवड केली जाते. निवडीवेळी महायुतीच्या सदस्यांची निवड झाली मात्र, जिल्ह्यात नव्यानेच पाय रोवू पाहत असलेल्या अजित पवार गटाला संधी मिळाली नव्हती. यानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला होता. अखेर आता नवीन चार सदस्यांची निवड झाली आहे. यात विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांना संधी मिळाली आहे. जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले व ‘नियोजना’चा अनुभव असलेल्या या चार सदस्यांची निवड केल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.