अजित पवार गटाची तासगावात चाचपणी, आर. आर. पाटील गट एकसंध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:48 PM2023-07-10T18:48:46+5:302023-07-10T18:49:11+5:30
भाजपच्या नेत्यांनी जवळीक वाढविली
दत्ता पाटील
तासगाव : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आर. आर. पाटील यांच्या वारसदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्धार केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अस्तित्व दाखविण्यात अपयश आले. मात्र, अजित पवार गटाकडून तासगाव तालुक्यात चाचपणी सुरू असून, राष्ट्रवादीतील कार्यकर्ते गळाला लागतात का? याचा कानोसा घेतला जात आहे. दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळमधील भाजपच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक साधल्याचे दिसत आहे.
तासगाव तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी असे दोन प्रमुख तुल्यबळ गट आहेत. खासदार संजय पाटील आणि आर. आर. पाटील गट हेच तालुक्यातील प्रमुख गट राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी राज्यभर स्वतःचा गट सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी समर्थकांना आपल्या बाजूला घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधून भेटीचा सांगावा पाठविला होता. मात्र, अद्यापपर्यंत अजित पवार यांच्या गळाला राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता लागला नसल्याचे दिसून येत आहे.
तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी गावपातळीवर अनेक गट आहेत. या गटांतर्गत राजकारणामुळे नाराजीचा सूरही आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव तालुक्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे जयंत पाटील समर्थकांची संख्या लक्षणीय झाली होती. त्यामुळे जयंत पाटील यांना मानणारा एक स्वतंत्र गट अलीकडच्या काळात तासगाव तालुक्यात तयार झाला आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार जयंत पाटील आणि आमदार सुमनताई पाटील या दोघांनीही शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केल्यामुळे तालुक्यात फारशी उलथापालथ झाली नाही. जयंत पाटील यांना मानणारा तालुक्यातील गटदेखील ‘आम्ही साहेबांबरोबर’ असा नारा देत राष्ट्रवादीसोबतच राहिला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतरदेखील एकसंध राहिला आहे.
भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे अभिनंदन
खासदार संजय पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भाजपच्या नेत्यांची अजित पवार यांच्याशी सलगी वाढल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक काही ठिकाणी लावले आहेत.