काही पुढारी राज्याचे, देशाचे राजकारण करतात; मात्र.., अजितदादांनी काढला जयंतरावांचा चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 06:17 PM2021-12-15T18:17:33+5:302021-12-15T18:18:36+5:30
अजित पवारांनी सरपंच व गावचा प्रमुख म्हणून उल्लेख करताना जयंतरावांना तरी चिमटा काढला नाही ना, अशी चर्चा सध्या सांगलीत रंगली आहे.
सांगली : काही पुढारी राज्याचे, देशाचे राजकारण करतात, मात्र गावातला सरपंचसुद्धा त्यांचे ऐकत नाही. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेला उपक्रम राबविताना किमान आपल्या गावातील प्रमुख तरी आपल्या विचाराचा असावा, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्यावतीने मुंबईत पार पडलेल्या व्हर्च्युअल रॅलीवेळी अजित पवार म्हणाले की, प्रदेशाध्यक्षांनी नवा उपक्रम जाहीर केला आहे. राज्यातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक पुढाऱ्याने महिन्याच्या पहिल्या शनिवारी गावाकडे जाऊन लोकांशी संवाद साधायचा. त्यांचा हा उपक्रम चांगला आहे, मात्र मनात त्यातून काही शंका उपस्थित झाल्या.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पुढाऱ्याने त्यांच्या गावातील प्रमुख किंवा सरपंच आपल्या विचाराचा असावा, याची काळजी घ्यावी. काही पुढारी राज्याचे व देशाच्या राजकारणात काम करतात आणि गावातील सरपंचसुद्धा त्यांचे ऐकत नाही. असे चित्र दिसता कामा नये. गावपातळीवर आपल्या विचाराच्या माणसांची बांधणी करायला हवी, असे त्यांनी सांगितले.
इशारा कोणाला, याची चर्चा
जयंत पाटील यांच्या इस्लामपूर शहरातील नगरपालिकेत विरोधी विकास आघाडीची सत्ता आहे. भाजपचा नगराध्यक्ष आहे. अजित पवारांनी सरपंच व गावचा प्रमुख म्हणून उल्लेख करताना जयंतरावांना तरी चिमटा काढला नाही ना, अशी चर्चा सध्या सांगलीत रंगली आहे.