अजब राजकारण : पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम... कुंपणावरील नेत्यांची नवी खेळी
By अविनाश कोळी | Published: September 27, 2023 05:25 PM2023-09-27T17:25:58+5:302023-09-27T17:31:13+5:30
माजी मंत्री अण्णा डांगे यांनी कोल्हापूर येथील अजित पवारांच्या सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी अजित पवारांशी स्नेह असल्याचे सांगितले.
सांगली : राजकारण्यांची निष्ठा अन् प्रेम यावर आता फारसा कोणाचा विश्वास उरलेला नाही. सोयीच्या राजकारणाचे रंग जसे राज्यात दिसताहेत तसेच ते जिल्ह्यातही बहरताहेत. जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मात्र, त्यावर खुलासा करताना खरे प्रेम जयंत पाटील व शरद पवारांवर असल्याचे सांगत अजित पवारांशी व्यक्तिगत नात्याचे स्पष्टीकरण दिले. कुंपणावरील अशा राजकारणाने नेते मात्र चक्रावून गेले आहेत.
आपला कोण, परका कोण, स्वार्थी कोण अन् निष्ठावान कोण, या प्रश्नांची उत्तरे लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना सांगणे कठीण झाले आहे. सत्तेच्या रंगात जसे पक्षबदलू नेते रंगून जात आहेत, तसेच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील समर्थक, कार्यकर्तेही चिंब भिजत आहेत. त्यामुळे राजकीय सभा, कार्यक्रमातून निष्ठा, प्रेम यासारखे शब्दही नेत्यांच्या तोंडून गायब झाले आहेत.
चौकट
व्यक्तिगत नाते व प्रेमाच्या कहाण्या
माजी मंत्री अण्णा डांगे यांनी कोल्हापूर येथील अजित पवारांच्या सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी अजित पवारांशी स्नेह असल्याचे सांगितले. दुसरीकडे जयंत पाटील यांच्याशी बंडखोरीचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही अजित पवारांची दोनदा भेट घेतली. त्यांच्याशी कौटुंबिक नाते व निष्ठा जयंत पाटील यांच्याशीच असल्याचा खुलासा त्यांनी नंतर केला.
मंत्रीच म्हणताहेत...कोण कुठे समजत नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कुठे आहे, हेच समजत नाही, असे मत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील दौऱ्यावेळी काढले. यातून त्यांनी राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील राजकारणात कसा गोंधळ झालाय, हेच स्पष्ट केले.
पेरले तेच उगवले
सांगलीच्या राजकीय इतिहासात शेवटपर्यंत पक्ष व नेत्याशी निष्ठा बाळगून राहण्याची परंपरा अनेकांनी जपली. त्याचबरोबर पक्षबदल करीत, निष्ठांना ठेंगा दाखवत, सोयीचे राजकारण करण्याच्या कहाण्याही अनेक नेत्यांनी नोंदविल्या. नेत्यांनी जे पेरले तेच आता राजकीय जमिनीतून उगवले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही आता सोयीच्या राजकारणाला प्राधान्य देताना दिसत आहेत.