इस्लामपुरात अजित पवारांना भाजपच्या फौजेचे पाठबळ, जयंत पाटीलांचे विरोधक एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 07:20 PM2023-07-07T19:20:28+5:302023-07-07T19:20:57+5:30
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील भाजपचे नेते आपापला गट मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतात. आता भाजपचे नेते राहुल महाडिक यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुंबई येथे जाऊन शुभेच्छा दिल्या. पवार यांनी राज्य सरकारमध्ये केलेल्या प्रवेशाचे स्वागत करत इस्लामपूर-शिराळ्यातील राजकीय घडामोडींवर चर्चाही केली. यातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधातील गट एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.
भाजपने विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिराळ्याची सम्राट महाडिक यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, भाजपचे नेते विक्रम पाटील, राहुल महाडिक समर्थकांत अस्वस्थता आहे. शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांचे समर्थक चलबिचल झाले आहेत.
आता अजित पवार यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारसोबत जाण्याचे ठरवल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधातील गट एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यातूनच आगामी काळात गटाची ताकद वाढवण्यासाठी राहुल महाडिक यांनी बुधवारी मुंबई गाठली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार केला. त्यांच्याशी चर्चाही केली.
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम आहेत. मात्र अजित पवारांच्या शपथविधीनंतर पवारांचे नातेवाईक केदार पाटील यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात केदार पाटील यांच्या पाठीशी भाजपमधील महाडिक गट राहील, असे संकेत आहेत.
आमचा संघर्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळेच मुंबईत जाऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. - राहुल महाडिक, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक