अजित पवारांचे सांगलीकरांना मोठे आश्वासन, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 02:11 PM2021-07-26T14:11:34+5:302021-07-26T14:16:14+5:30
Sangli Flood: 'उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.'
सांगली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूर परिस्थितीची पाहणी करताना महिलांनी अजित पवारांकडे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी त्या महिलांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. या पाहणीदरम्यान अजित पवारांसोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.
अजित पवारांनी भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील दिली. यावेळी त्यांनी भिलवडी परिसरातील ज्या घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा आणि वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा, अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे, भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली.
खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द
अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला. याबाबत सांगाताना ते म्हणाले की, हेलिकॉप्टर उड्डाण घेत नसल्याने मी कोल्हापूर दौरा रद्द करुन सांगलीला आलोय. इथे पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक असून त्या बैठकीत या सर्व परिस्थितीचा आढावा मांडून आम्ही योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. दरम्यान, आज सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार यांची पूरग्रस्तांच्या मदत आणि पुर्नवसनाच्या अनुषंगानं आज महत्वाची आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होईल.