सांगली : पदोन्नतीमधील आरक्षणापासून अन्य मागासवर्गीयांविरोधातील भूमिकांमागे राष्ट्रवादीचा आणि विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने दुसऱ्या बाजूंनी या महापुरुषांच्या विचारांविरोधात वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील ओबीसी समाजावर या सरकारने अन्याय केला. राजकारणातील आरक्षण संपवताना पदोन्नतीमधील आरक्षणही रद्द केले आहे. ओबीसी समाजातील नेते आत्ताच जागे झाले नाहीत, तर हे सरकार नोकरी व शिक्षणातील आरक्षणही संपुष्टात आणेल.
मराठा, धनगर, ओबीसी यांच्यासह सर्वच मागसवर्गीय लोकांवर अन्याय करण्याचे काम या सरकारने केले आहे. ओबीसींच्या प्रश्नावर कोणी कुठे बैठका घेत आहे, याच्याशी आम्हाला देणे-घेणे नाही.
चौकट
मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत
राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी पक्ष म्हणून नव्हे तर समाजासाठी एकत्र यावे. बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी धोरणांविरोधात ज्या पद्धतीने राजीनामा दिला, त्यापद्धतीने त्यांनीही समाजासाठी राजीनामे द्यावेत, असे आवाहन पडळकरांनी केले.
चौकट
ओबीसीच्या कोट्याला धक्का नको
मराठा समाजातील नेत्यांनी कधीही ओबीसी कोट्यात जागा मागितली नाही. ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आमचीही मागणी आहे, असे पडळकर म्हणाले.