मैनुद्दीन बागवान यांच्या निवासस्थानी अजितदादांची भेट, मिरज संघर्ष समितीत जाणाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:53 PM2018-04-05T23:53:38+5:302018-04-05T23:53:38+5:30
मिरज : मिरजेत संघर्ष समितीत जाणाºया राष्ट्र वादी नगरसेवकांना रोखण्यासाठी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हल्लाबोल’ यात्रेसाठी मिरजेत आलेले माजी उपमुख्यमंत्री
सदानंद औंधे ।
मिरज : मिरजेत संघर्ष समितीत जाणाºया राष्ट्र वादी नगरसेवकांना रोखण्यासाठी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हल्लाबोल’ यात्रेसाठी मिरजेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघर्ष समितीच्या वाटेवर असलेले राष्ट्र वादीचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांच्या निवासस्थानी भेट दिली. राष्ट्र वादीचे आनंदा देवमाने भाजपच्या वाटेवर असून, कुंपणावर असलेल्या राष्ट्र वादीतील नगरसेवकांना रोखण्यासाठी आ. पाटील मिरजेत तळ ठोकणार आहेत.
महापालिका प्रभाग रचनेत मिरजेत कारभारी नगरसेवकांच्या प्रभागांचा विस्तार झाला आहे. थोड्याफार फरकाने सर्वांना पुन्हा संधी मिळणार आहे.
इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, विवेक कांबळे, शिवाजी दुर्वे, अतहर नायकवडी, अल्लाउद्दीन काझी, निरंजन आवटी, जुबेर चौधरी, महादेव कुरणे, चंद्रकांत हुलवान आदी काँग्रेस, राष्ट्र वादीचे आजी-माजी नगरसेवक एकत्रित आले आहेत. संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील नगरसेवकांचा दबावगट निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मिरजेत राष्ट्र वादीचे सात नगरसेवक असून, यापैकी आनंदा देवमाने राष्ट्र वादीला रामराम ठोकून भाजपच्या वाटेवर आहेत. मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, अल्लाउद्दीन काझी, जुबेरचौधरी संघर्ष समितीच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्र वादीला उमेदवार शोधावे लागणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांनी मिरजेतील कुंपणावर असलेल्या मैनुद्दीन बागवान यांच्यासह अन्य नाराज मंडळींना रोखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हल्लाबोल यात्रेसाठी मिरजेत बुधवारी झालेल्या सभेसाठी आनंदा देवमाने व शुभांगी देवमाने वगळता राष्ट्र वादीचे अन्य सहा नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्र वादीचे नेते अजित पवार यांनी मैनुद्दीन बागवान यांची निवासस्थानी भेट घेतली. अल्लाउद्दीन काझी व मैनुद्दीन बागवान प्रभाग सहामधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. काझी यांनी बागवान यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा इशारा दिल्याने निवडणुकीपूर्वीच राष्ट्र वादीच्या नगरसेवकांत वादाची ठिणगी पडली आहे. पक्षातील नाराज मंडळींची समजूत काढण्यासाठी जयंत पाटील दि. ८ पासून सांगली-मिरजेत तळ ठोकणार असल्याची माहिती मिळाली.
परिस्थिती बदलली
राष्ट्र वादी नगरसेवक मैनुद्दीन बागवान मिरज दंगलीतील आरोपी असल्याने तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर येण्यास मज्जाव होता. मात्र बदलत्या परिस्थितीत मैनुद्दीन बागवान यांनी पक्ष सोडू नये, यासाठी राष्ट्र वादीचे नेते त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत.
भाजपच्या वाटेवर चौघे
संघर्ष समितीने मिरजेतील काँग्रेस व राष्ट्र वादीतील नगरसेवकांना जाळ्यात ओढले आहे. मात्र संघर्ष समितीतील नगरसेवक सुरेश आवटी, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने भाजपच्या वाटेवर असून, त्यांची भाजपची उमेदवारी निश्चित झाली असल्याची चर्चा आहे.