सांगली : गेल्या २० वर्षात म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकर्यांच्या दारात पोहोचू शकले नाही, याला लोकशाही म्हणायची का? शेतकर्यांनी वारंवार आंदोलने केली, पण त्यांची साधी दखलही घेतली गेली नाही. शेतकर्यांनी न्याय मागायचा की नाही?, असा प्रश्न पडतो. या सार्याला शासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, असा घरचा आहेर देत, म्हैसाळच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. घोरपडे यांनी पाणीप्रश्न हाती घेत विधानसभेसाठी शड्डू ठोकल्याचे बोलले जात आहे. सांगलीतील पाटबंधारे भवनात म्हैसाळ योजनेंतर्गत येणार्या लाभधारक शेतकर्यांची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेनंतर पत्रकारांशी बोलताना घोरपडे यांनी राज्य शासनावर आसूड ओढले. ते म्हणाले की, वीस वर्षापूर्वी म्हैसाळ योजनेला सुरूवात झाली. या कालावधित कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. पाटबंधारे खाते सांभाळणारे अजित पवार, शशिकांत शिंदे अनुशेषाचे कारण देत आहेत. वीस वर्षात अनुशेषाचा प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. म्हैसाळ योजनेला निधी मिळत नाही. त्यासाठी खासगीकरणाचा पर्यायही सुचविला होता. पण नाकर्त्या शासनाकडून त्यावर निर्णय घेतला नाही. म्हैसाळ योजनेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘म्हैसाळ’साठी रस्त्यावर उतरू अजितराव घोरपडे : शासनावर नाकर्तेपणाचा आरोप
By admin | Published: May 14, 2014 12:10 AM