सांगली : कळंबी (ता. मिरज) येथील अजितराव घोरपडे विद्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विविध ७५ उपक्रमांचा विक्रम केला आहे. याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपक्रमांना दाद दिली आहे. मुख्याध्यापक डी. एन. पाटील व कलाशिक्षक आदमअली मुजावर यांनी ही माहिती दिली.जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकित शाळा असणाऱ्या घोरपडे विद्यालयाला स्वच्छ भारत अभियानात जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध ७५ उपक्रमांसाठी इंटरनॅशनल बुकमध्ये नोंद होणारी ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा ठरली आहे. उपक्रमांचा एक भाग म्हणून पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ७ हजार ५०० पत्रे पाठविण्यात आली. त्याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.योगा, सूर्यनमस्कार, पोस्टर प्रदर्शन, मेंदी रंगभरण, उत्कृष्ट स्वाक्षरी स्पर्धा, पाढे निर्मिती कार्यशाळा, लेझीम पथक, झांझपथक, मॅरेथॉन स्पर्धा, तिरंगा फेस पेंटिंग, स्मरणशक्ती स्पर्धा, म्हणी, शेरोशायरी सादरीकरण, चारोळी, बोधकथा, पोस्टकार्डद्वारे संदेश, आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार, पथनाट्ये, तिरंगा सायकल रॅली, क्रांतिकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन, वॉल पेंटिंग प्रदर्शन, निसर्ग चित्रे, वर्ग सजावट, विज्ञान प्रदर्शन व अपूर्व विज्ञान मेळावा अटल टिंकरिंग लॅब, साहित्य निर्मिती, प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य मॉडेल, इंग्रजी, मराठी, हिंदी घोषवाक्य स्पर्धा, इंग्रजी समृद्धीकरण कार्यक्रम, पुस्तक परिचय, प्रदर्शन असे ७५ उपक्रम राबविले. त्यात प्रत्येकी ७५ विद्यार्थी सहभागी झाले. याची दखल रेकॉर्डसाठी घेण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घोरपडे विद्यालयाच्या ७५ उपक्रमांचा विक्रम, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By संतोष भिसे | Published: October 07, 2022 3:47 PM