सांगली : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सांगलीतील सहभागी झालेल्यांची संख्या वाढत असून, पाचजणांचा प्रत्यक्ष सहभाग होता, तर काहीजण त्यांच्या संपर्कात आले होते. अशा अकराजणांना सध्या इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अजूनही कोणी यात सहभागी होते का, याची माहिती घेतली जात आहे.
दोन आठवड्यापूर्वी दिल्लीत निजामुद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी जगभरातील लोक आले होते. यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासनाने शोध घेतला असता, सांगली जिल्'ातील तिघेजण सहभागी झाल्याचे व त्यांना दिल्लीतच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. तरीही त्यांच्या संपर्कातील एकाला व त्या कालावधित दिल्लीतून मुंबईला विमान प्रवास करणाऱ्या तिघांना असे चौघांना बुधवारी प्रशासनाने क्रीडा संकुलातील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवले होते.
आता कार्यक्रमात पाचजणांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. ते आणि संपर्कात आलेले सहाजण अशा अकराजणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून, त्यातील चारजणांच्या स्रावाचे नमुने बुधवारी, तर इतरांचे नमुने गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
या सर्वांना जिल्हा क्रीडा संकुलात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. खबरदारी म्हणून प्रशासनाने त्यांच्या क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे.इतरांचा शोध सुरूतबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण अकराजणांना क्वारंटाईनमध्ये ठेवून त्यांच्या स्रावाचे नमुने पाठविण्यात आले आहेत. यामध्ये तासगाव, इस्लामपूर, सांगली व मिरज येथील व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यासह अन्य कोणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते का, याची माहिती प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.