सांगली : देशद्रोह, नक्षलवाद, जातीयवादामुळे समाजाचा उलट दिशेने सुरू असलेला प्रवास देशाच्या एकतेला बाधा आणणारा आहे. त्यासाठीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सामाजिक तत्त्वांच्या अखंडतेसाठी सांगली शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली.
स्वामी विवेकानंद जयंती, जिजाऊ जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सांगलीत ३२५ फूट लांबीच्या तिरंग्याची यात्रा मंगळवारी आयोजित केली होती. राममंदिर चौकातून निघालेल्या या यात्रेचा समारोप विश्रामबाग चौकात जाहीर सभेने झाला.
दि. १२ जानेवारीस स्वामी विवेकानंद जयंती ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती यादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवक सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा समारोप मंगळवारी तिरंगा यात्रेने झाला. यात्रेचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड यांच्याहस्ते झाला. यात्रेत राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. पुष्पराज चौक, मार्केट यार्ड, गेस्ट हाऊस मार्गे निघालेल्या या यात्रेचे मे. चंदुकाका सराफ, हॉटेल सिझन फोर व हॉटेल अॅम्बॅसिडर यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.
प्रथमेश परूळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद बेळंके यांनी स्वागत केले. यावेळी दीपांजली पिसे, पायल कुंभोजे यांनी मनोगत व्यक्त केले. मिरज महानगर मंत्री बाहुबली छत्रे, उपेंद्र कुलकर्णी, जयदीप पाटील, प्रतीक पाटील, विशाल जोशी, वृषभ आळतेकर, स्वानंद पिसे, महेश खारकांडे, अमृता बियाणी, श्रावणी शितीकर, रोहित राऊत, प्रा. निर्भय विसपुते, प्रवीण जाधव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.सबसे बडा राष्ट्रवाद...यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अभिजित पाटील म्हणाले, ‘ना माओवाद... ना नक्षलवाद... ना जातीयवाद... सबसे बडा राष्ट्रवाद’ या तत्त्वांचा पुरस्कार करण्याची अभाविपची भूमिका आहे. सामाजिक तत्त्वे व मूल्यांची जपणूक होण्यास या तिरंगा यात्रेद्वारे मदत होत आहे. देशद्रोही, समाजकंटकांना या माध्यमातून चपराक बसली आहे.