सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला बाजारपेठेत चांगलाच उत्साह जाणवला. गुढीपाडवा होऊन महिनाभराचा कालावधी झाला असतानाही मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी झाली होती. लवकरच सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सोने खरेदीसाठी विशेष गर्दी दिसून आली. शहरातील नामांकित पेढ्यांमध्ये रांगा लावून सोन्याची खरेदी सुरू होती. यासह इलेक्ट्रिक वाहनांचीही चांगली विक्री झाली. दीडशे कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.अक्षय तृतीयेदिवशी किमान एक ग्रॅम का होईना सोने खरेदी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. या मुहूर्तावर केलेली सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील सराफ बाजारसह प्रमुख मार्गावरील पेढ्यांमध्ये गर्दी होती. दोन दिवसांपासून सोने दरातही काहीशी घट झाल्याने ग्राहकांनी आनंद व्यक्त केला.दुचाकीच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी यावेळी चांगला प्रतिसाद दिला. दुचाकीच्या किमती लाखाच्या घरात गेल्या असल्यातरी वाहन खरेदीला प्राधान्य दिले. त्यातही इलेक्ट्रिक वाहनांस सर्वाधिक पसंती होती. सरासरी एक हजार वाहनांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्रातही चांगले व्यवहार गुढीपाडव्या दिवशी फ्लॅटचे बुकिंग केलेल्या काही ग्राहकांनी अक्षय तृतीयेला फ्लॅटचा ताबा घेतला. गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम क्षेत्रातही चांगले व्यवहार होत असल्याने घराचे स्वप्न पाहत असलेल्या सांगलीकरांनी त्यास प्रतिसाद दिला. विविध फायनान्स कंपन्यांकडून सुलभ सुविधा असल्यानेही त्यास मिळाला.