सांगली : सांगलीतील बापट मळ्यात सोमवारी दुपारी तस्कर जातीच्या बिनविषारी सापाचे 'अल्बिनो' पिलू नागरीकांना आढळले. ते दिसायला वेगळे होते आणि विषारी असावे या समजातून त्याला मारून टाकण्याचे प्रयत्न काहींनी सुरु केले.मिरजेचे प्राणीमित्र विघ्नेश यादव यांनी नागरिकांना परावृत्त करुन सापाला जीवदान दिले. नेचर कॉन्जर्व्हेशन सोसायटीचे वन्यजीव कार्यकर्ते गौरव हर्षद यांनी त्याला ताब्यात घेऊन वन विभागाकडे सुपुर्द केले. वन विभागाने या सापाला निसर्गात सुरक्षितपणे मुक्त केले. सुमारे तीन ते चार फूट लांबी आणि लालभडक डोळे यामुळे सापाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. दिवेकर यांनी सांगितले की, अल्बिनो प्राण्यांच्या शरीराचा रंग सामान्यत: पांढरा असतो. शरीरात रंगद्रव्याच्या अभावी फिकट किंवा पांढरट होतो. असे प्राणी निसर्गात फार काळ जगत नाहीत. त्यांच्या फिकट रंगामुळे शत्रू आणि त्यांचे भक्ष्य असलेले प्राणी या दोघांनाही त्यांचा पटकन सुगावा लागतो. प्राण्यांच्या शरीरातील रंगद्रव्य हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्यांच्या अंतर्गत अवयवांचे संरक्षण करत असते. पण 'अल्बिनो' प्राण्यांमध्ये हे घडत नाही.
सांगलीत सापडले 'अल्बिनो' तस्कर सापाचे पिलू
By संतोष भिसे | Published: July 02, 2024 4:47 PM