सांगली : भाविकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या गणपतीमंदिर परिसरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात आली आहे. महापालिकेने येथे दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविकांची वर्दळही कमी झाल्याचे दिसत आहे.सांगलीच्या पंचायतन गणपतीमंदिरात दररोज सांगली शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. संकष्टीदिवशी तर मोठी गर्दी होत असते. या मार्चमधील संकष्टीलाही मोठी गर्दी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मंदिरांसाठी निर्बंध लागू नसले तरी, मंदिर प्रशासनांनी आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगल्याचे दिसत आहे. सांगलीच्या गणपती मंदिर प्रशासनाने महापालिकेला याबाबतचे पत्र देऊन स्वच्छता, औषध फवारणी व अनुषंगिक उपाययोजना करण्याबाबतची विनंती केली होती. त्याप्रमाणे महापालिकेने औषध फवारणी केली असून दैनंदिन स्वच्छतेबाबतही प्रयत्न चालू केले आहेत. मंदिर प्रशासनामार्फतही दररोज स्वच्छता केली जाते.
कोठेही कचरा निर्माण होऊ नये यासाठी येथे पूर्वीपासूनच यंत्रणा कार्यान्वित आहे. तरीही मंदिराभोवती व परिसरात औषध फवारणीबाबत प्रशासनाने महाालिकेला विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंदिर परिसरात नित्यनियमाने येणाऱ्या भाविकांची संख्या कायम असली तरी, जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या घटल्याचे दिसत आहे. दुपारीही काही काळ वर्दळ कमी होत आहे.