फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथील टाकीलगत काटेरी झुडपे उगवली असल्याने टाकीस धोका होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : भवानीमळा-पुजारवाडी (ता. आटपाडी) येथे गावाला सध्या नळाद्वारे शेवाळयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
येथील भवानी मंदिराच्या पाठीमागे ही टाकी असून या टाकीतून संपूर्ण भवानी मळा, माळी वस्ती, पवार मळा आदी भागांत पाणीपुरवठा केला जातो. भवानी मंदिरातही पिण्यासाठी पाण्याचा नळ काढण्यात आला आहे. ज्या नागरिकांकडे नळाचे कनेक्शन नाही ते मंदिरातून पाणी नेतात; परंतु शेवाळयुक्त पाणी नळातून येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाण्याची टाकी वारंवार धुतली जात नाही. त्याचबरोबर टीसीएल पावडरचा वापरही केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ही पाण्याची टाकी स्वच्छ धुवून व टीसीएल पावडरचा योग्य वापर करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
चाैकट
झुडपांचा धोका
या पाण्याच्या टाकीला झुडपांनी वेढा घातला असून, टाकीस धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर टाकीच्या वरील भागावर गवत उगवलेले आहे. तसेच टाकीस गळतीही लागली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. टाकीलगत असणारी चिलारची झुडपे काढून परिसर स्वच्छ करावा व नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.