कासेगाव : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील कासेगावसह येवलेवाडी, तांबवे व नेर्ले या गावांतील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबविणार आहोत. या गावातील क्षारपड जमिनीचा सर्व्हे लवकरच सुरू करीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक देवराज पाटील यांनी दिली.
कासेगाव ग्रामपंचायत सभागृहात देवराज पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, उपअभियंता आर.बी. गाजी, बाजार समितीचे उपसभापती सुरेश गावडे, सरपंच किरण पाटील, सोमेश्वर पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील उपस्थित होते. देवराज पाटील म्हणाले, आपल्या परिसरात क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे असल्याने जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६-७ वर्षांपूर्वी कासेगाव, उरूण इस्लामपूर, साखराळे, बोरगाव या गावांतील २ हजार ५०० एकर क्षारपड जमिनीची शासनाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात आली आहे. यातून कासेगावातील २५० एकर जमिनीची सुधारणा करण्यात आली असून, या क्षेत्रात चांगले उत्पादन घेतले जात आहे. जयंत पाटील यांनी ४० वर्षांपूर्वीचा शासन निर्णय बदलल्याने शेतकऱ्यांच्या क्षारपड जमिनी सुधारण्याचे प्रकल्प राबविले जात आहेत. पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करून त्या- त्या गावातील क्षेत्र व खर्च निश्चित केले जाणार आहे. यातून हजारो एकर क्षारपड जमिनीची सुधारणा होऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पातून कासेगावतील ७०० एकर जमिनीची सुधारणा केली जाणार आहे.
यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे इरिगेशन ऑफिसर डी.एम. पाटील, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता प्रवीण वसगडेकर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी उपसरपंच शशिकांत डबाणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील व शेतकरी उपस्थित होते.