नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील नेर्ले नं. १ सर्व सेवा सहकारी सोसायटीमध्ये कर्ज प्रकरणासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ३ लाख ४० हजार ५०० रुपयांच्या अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, सचिव व बँक निरीक्षकासह सर्व संचालक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी भालचंद्र केशव परांजपे यांनी दिला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी प्राप्त झालेल्या आदेशाची माहिती देण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील, कृष्णेचे माजी संचालक वसंतराव पाटील, संचालक भीमराव पाटील, जिल्हा बँक निरीक्षक दिलीप लक्ष्मण आरळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नेर्ले नं. १ संस्थेत ३ लाख ४० हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, तत्कालीन सचिव व बँक निरीक्षक यांच्याविरोधात २ मार्च २०२१ रोजी कासेगाव पोलिसांत उपलेखापरीक्षक मानसिंग शिवाजीराव देसाई यांनी फिर्याद दाखल केली होती. याबाबत संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर सहकार अधिनियम १९६० चे कलम ८८ व नियम ७२नुसार चौकशी झाली. त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी नेर्ले नं. १ या संस्थेचे पदाधिकारी, सचिव, बँक निरीक्षक हे दोषमुक्त असलेचे जाहीर करून चौकशी शुल्क भरण्याचे आदेश चौकशी अधिकारी यांनी दिले.
या प्रकरणात काही ही तथ्य नसून राजकीय व संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेले हे खेदजनक कृत्य असल्याचे मत अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, २७ जुलै १९२७ची ही संस्था असून, आजपर्यंत या संस्थेला १११ वर्षे झाली, परंतु मयताच्या वारसाने असा आरोप कधीच केला नाही. हे दु:खदायक आहे. आमची लढाई कायदेशीर होती व आम्हांला न्याय मिळाला. माझ्यासह संचालकांच्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या. या केसेस संदर्भात आमचे मत, त्रुटी, दोष जाणून घ्यायला संधी दिली नाही. यावेळी नंदकुमार वंजारी, अधिकराव माळी, हणमंत माळी उपस्थित होते.